
कणकवली : स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे.संमेलनाध्यक्षपदी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांची यापूर्वीच निवड करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घघाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक स्वामीराज प्रकाशनाचे रजनीश राणे आणि प्रभा प्रकाशनाचे अजय कांडर यांनी दिली.
गिरणगावचे आमदार मनोज जामसुतकर स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाच्या उदघाट्नानंतर मास्तरांची सावली साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून यात सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर सिंधुदुर्ग, ज्येष्ठ लेखक प्रदीप आवटे, पुणे, लेखिका डॉ.योगिता राजकर, वाई, कवी सुनील उबाळे, छ.संभाजीनगर, कवी सफरअली इसफ, सोलापूर आणि ललित लेखिका सुजाता राऊत मुंबई या साहित्यव्रतींचा गौरव करण्यात येणार आहे. तर याचवेळी "कृतज्ञता सन्मानाने" ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुस्कर, शिक्षण तज्ञ डॉ. भाऊ कोरगावकर, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, नामवंत संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यां साहित्यव्रतींचा "मराठी आठव दिवस" निमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. दु. १२ वा. नारायण सुर्वे यांच्या कवितांचे संगीत सादरीकरण लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे करणार असून याला सुभाष खरोटे आणि राजेश धनावडे यांची संगीत साथ लाभणार आहे. यानंतर दु. १२. ३० वा. सुर्वे मास्तरांच्या कवितेतील गिरणगाव कुठे हरवला? या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी नारायण जाधव, मुंबईचे अभ्यासक नीतीन साळुंखे, संवादक सुधीर चित्ते यांचा सहभाग असणार आहे.
दुसऱ्या सत्रात दु. २. ३० एम मल्टिमीडिया निर्मित लेखक प्रदीप राणे आणि प्रशांत जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली नंदकिशोर भिंगारदिवे, वासंतिका वाळके नारायण सुर्वे यांच्या कवितांवर "स्वगत स्वगते" ही एकांकिका सादर करण्यात येणार आहेत. दु. ३. ३० वा. अजितेम जोशी यांच्या संकल्पनेतून सुर्वे मास्तरांच्या कवितांचे अभिवाचन होणार असून यात उपेंद्र दाते, अशोक परब, ज्ञानराज पाटकर, आशुतोष घोडपडे, यामिनी दळवी, अमृता मोडक आणि अभिनेत्री सुप्रिया विनोद यांचा सहभाग असणार आहे. दु. ४. ४५ वा. चित्रपट दिग्दर्शक अशोक राणे यांच्या अध्यक्षतेखाली "पंचतारांकित गावाने गिरणगाव गिळले, मास्तर तुम्हीच सांगा आता लिहायचे काय, वाचायचे काय," हा परिसंवादा होणार असून माजी आमदार अरविंद नेरकर, दिग्दर्शक विनायक कोळवणकर, मास्तरांचे सोबती राजन बावडेकर, गिरणगावचे अभ्यासक व लेखक अविनाश उषा वसंत हे अभ्यासक यात सहभागी होतील. सायं. अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलनात सायमन मार्टिन, अंजली ढमाळ, सतीश सोळंकुरकर, संगीता अरबुने, वर्जेश सोलंकी, फेलिक्स डिसोजा, वृषाली विनायक, इंग्निशियस डायस, भगवान निळे, ज्योत्स्ना राजपूत, प्रकाश ग.जाधव, रमेश सावंत, गीतेश शिंदे, योगिनी राऊळ, जितेंद्र लाड, प्रशांत डिंगणकर, विनायक पवार, भीमराव गवळी, विजय सावंत, किशोर डी. कदम, सत्यवान साटम, शिवाजी गावडे यांचा सहभाग राहणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप सोहळा राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. अधिक माहितीसाठी संपर्क - मो. 9820355614 / 9404395155