आमची जनगणना आमचा विकास

घारपीत सुरुवात
Edited by:
Published on: May 16, 2026 16:21 PM
views 46  views

बांदा : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना २०२७ अभियानाच्या पूर्वतयारी अंतर्गत घारपी येथे घरांची यादी व घरांची गणना माहिती संकलन कार्यास आजपासून उत्साहात सुरुवात करण्यात आली. हे अभियान १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेद्वारे गावातील प्रत्येक घराची अचूक माहिती नोंदविण्यात येणार आहे. यामध्ये घरासंबंधी तपशील, कुटुंबातील सदस्यांची माहिती, उपलब्ध मूलभूत सुविधा, मालमत्ता,  तसेच इतर आवश्यक बाबींचे संकलन करण्यात येणार आहे.

घारपी येथे प्रगणक म्हणून शिक्षक जे. डी. पाटील हे माहिती संकलनाचे काम पाहत असून घरभेटीद्वारे नागरिकांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. जनगणना प्रक्रियेमुळे शासनाला भविष्यातील विकासकामांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असून विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

जनगणना प्रक्रिया ही देशाच्या विकासाचा महत्त्वाचा पाया मानली जात असल्याने नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गावपातळीवर सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे जनगणना २०२७ च्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.