अन्यथा...१ डिसेंबरला उग्र आंदोलन करू!

'मनसे'चा बेकायदा दारू वाहतूकविरुद्ध एल्गार
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 09, 2022 20:28 PM
views 176  views

 सावंतवाडी : गोव्यातून चंदगडच्या दिशेने तसेच  कुंभवडे, तळकट, मोर्ले ते परगड येथून होणारी बेकायदा दारू वाहतूक कोल्हापूर येथील भरारी पथक रोखत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक गाडी विजघर चेकपोस्टमधून माहित असून सुद्धा सोडण्यात आली होती. ती गाडी पुढे घाटात जाऊन बंद पडली. विजघर चेकपोस्ट येथे अधिकारी असून सुद्धा येथून दारूची गाडी गेलीच कशी? राज्य उत्पादन शुल्क विभाग, सिंधुदुर्ग मध्ये असून सुद्धा अशा प्रकारची वाहतूक होते. म्हणजे गस्त घालणारे अधिकारी हफ्ते घेण्यात व्यस्त आहेत काय? असा सवाल दोडामार्ग विभाग अध्यक्ष अभय देसाई यांनी केला.

दोडामार्ग तालुक्यामधील विजघर चेकपोस्टला असणारे अधिकारी हफ्ते घेऊन सुशेगात आहेत. विजघर चेकपोस्टजवळ सीसीटीव्ही कॅमेरा २४ तास चालू असतानासुद्धा रोज १० ते १५ लाखापेक्षा जास्त किमतीची दारू वाहून रोज दारूच्या गाड्या त्या चेकपोस्टवरून सहज पार होतात. त्यामुळे या प्रकारामागे नेमके दडलंय तरी काय? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हफ्ता घेण्यात व्यस्त असलेले चित्र आता मनसे स्टाईलने बंद करण्याची वेळ आली आहे. तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा १ डिसेंबरला विजघर 'एक्साईज चेकपोस्ट' येथे उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या माध्यमातून दोडामार्ग मनसे विभाग अध्यक्ष अभय पांडुरंग देसाई यांनी दिला आहे.

 गोवा बनवट दारूची वाहतूक रोखण्यासाठी विजघर चेकपोस्टला सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला. परंतु मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अधिकारी कशात व्यस्त आहेत? याचा विचार करण्याची गरज आहे. गोवा बनवट दारू वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने होत आहे? यांचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे मनसेकडून १ डिसेंबर रोजी विजघर चेकपोस्ट येथे मनसे स्टाईलने 'उग्र आंदोलन' करण्यात येईल ,याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असेही मनसेने कळविले आहे.