
वेंगुर्ला:
तालुक्यातील उभादांडा ते शिरोडा नादुरुस्त झालेल्या रस्त्याबाबत तसेच रेडी आरोंदा मुख्य रस्ता ते गावतळे गोळतूळवाडी या रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत आज (२५ एप्रिल) जि. प चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ व भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकामच्या वेंगुर्ला उपविभागीय कार्यालयाला धडक देत जाब विचारला. दरम्यान याबाबत निवेदन सादर करत ही दोन्ही कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास वेंगुर्ला भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सार्वजनिक बांधकामला देण्यात आला.
यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा ते वेंगुर्ला रस्त्याचे वेंगुर्ला ते उभादांडा डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित उभादांडा ते शिरोडा हा रस्ता पूर्ण नादुरुस्त झालेला आहे. खड्ड्यामुळे अपघातचे प्रमाण देखील वाढले आहे. वाहन धारकामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे. त्यामुळे सदर उर्वरित रस्ता मे महिना अगोदर पूर्ण करावा. तसेच रेडी- आरोंदा मुख्य रस्ता ते गावतळे गोळतूळवाडी रस्ता मंजूर झाला असून त्याचे टेंडर होऊन काम सुरू झाले. मात्र ते काम ठेकेदाराने अर्धवट स्थितीत केले आल्याने लवकरात लवकर ते पूर्ण करण्याच्या लेखी सूचना आपल्या विभागामार्फत देण्यात याव्यात अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन वेंगुर्ला भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. दरम्यान निधी असतानाही ठेलेदारला पाठीशी घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असून याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन तक्रार करण्यात येईल असे प्रितेश राऊळ यांनी सांगितले. यावेळी शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले, मच्छिमार नेते वसंत तांडेल, शिरोडा भाजपचे पदाधिकारी लक्ष्मीकांत कर्पे आदी उपस्थित होते.