अन्यथा अणसुर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेलं

निवेदनाद्वारे वेधले विद्युत वितरणचे लक्ष
Edited by: दिपेश परब
Published on: June 11, 2024 13:00 PM
views 240  views

वेंगुर्ला : ग्रामपंचायत अणसूर कार्यक्षेत्रात गेले दोन महिने म्हणजेच एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दररोज दिवसातून ३ ते ४ वेळा विज खंडित होत आहे. मात्र ग्रामस्थांना भरमसाट विजेची बिले देण्यात आली आहेत. तसेच गावातील जीर्ण झालेले पोल वारंवार कळवून सुद्धा बदलण्यात आले नाहीत. यामुळे पुढील एका आठवड्यात आपल्या कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास अणसूर गावातील ग्रामस्थांच्या रोषाला आपल्या कार्यालयास सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी असा इशारा अणसूर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे वेंगुर्ला विद्युत वितरण विभागाला दिला आहे. 

अणसुर सरपंच सत्यविजय गावडे यांच्यासाहित ग्रामस्थ सचिन गावडे, प्रभाकर गावडे, विजय गावडे, संदेश गावडे, वामन गावडे, चंदू गावडे, देऊ गावडे यांनी सोमवारी १० जून रोजी वेंगुर्ला विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता श्री वाघमोडे यांची भेट घेऊन गावातील विद्युत पुरावठ्या संदर्भातील विविध समस्यांवर लक्ष वेधले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गावात विजभार कमी जास्त होत असल्याने घरातील विजेवरील उपकरणे नादुरुस्त होत आहेत. वारंवार कार्यालयास कळवूनही अणसूर गावातील जीर्ण झालेले पोल (गंजलेले) अदयापही बदलण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे जंगलातून व शेतातून गेलेले पोल बदली करण्यास वारंवार कळवूनही पोल बदलण्याची कार्यवाही अदयापपर्यंत करण्यात आलेली नाही. शेतातून गेलेल्या पोलामुळे शेतक-यांची जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जीर्ण झालेले पोल पडून जिवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? 

याउलट भरमसाट बिले आकारून ग्रामस्थांची चालविलेली लूट न थांबवल्यास, जीर्ण झालेले पोल बदली करून न दिल्यास तसेच वारंवार जाणारी लाईट याबाबत एका आठवडयाच्या आत आपल्या कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास अणसूर गावातील ग्रामस्थांच्या रोषाला आपल्या कार्यालयास सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.