
वैभववाडी : महावितरणच्या नियोजनशुन्य कारभारामुळे तालुक्यात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे.सतत खंडित होणा-या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांपासुन व्यापाऱ्यापर्यत सर्वच हैराण झाले आहेत.विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणला आज ता.११ देण्यात आला.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन विजेचा लपंडाव सुरू आहे.सतत विजप्रवाह खंडित होत आहे.काही भागात रात्रभर विजपुरवठा बंद असतो.यासंदर्भात आज ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके,उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे,ठाकरे युवा सेनेचे स्वप्निल धुरी,अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष रजब रमदुल,सुनील कांबळे,रवींद्र मोरे,गणेश पवार,शंकर कोकरे आदी पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता यांची भेट घेतली.महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढाच कार्यकर्त्यानी वाचला.वेळोवेळी मागणी करून देखील कोणतीही कामे पावसापुर्वी करण्यात आलेली नाहीत त्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे.त्यामुळे येत्या आठ दिवसांत तालुक्यातील सर्व गंजलेले विद्युत खांब बदलण्यात यावेत,विद्युत वाहीन्यावरील झाडी तात्काळ हटविण्यात यावी,जीर्ण वाहीन्या बदल्यात याव्यात,उच्च क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत,अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमस्वरूपी वायरमन द्यावा यासह विविध मागण्यां त्यांनी केल्या.या मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे शिवसेनेच्यावतीने देण्यात आला










