खाण सुरक्षा सप्ताहाचा शानदार समारोप ; 'झिरो हार्म' हेचं उद्दिष्ट : खाण सुरक्षा महासंचालक उज्जव ताह

Edited by: विनायाक गांवस
Published on: May 16, 2026 13:17 PM
views 85  views

पणजी : आपले उद्दिष्ट 'झिरो हार्म' हे आहे. सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याण हे तीन स्तंभ आपल्या कायद्यात आणि नियमांमध्ये पूर्णपणे समाविष्ट आहेत. या गोष्टींची योग्य अंमलबजावणी केली तर शून्य अपघात, शून्य हानी हे आपले उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल आणि आपण 'ग्रीन मायनिंग'चे ध्येय गाठू शकू, असे प्रतिपादन खाण सुरक्षा महासंचालक, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार उज्ज्वल ताह यांनी केलं. गोवा‌ येथील ४२ व्या वार्षिक खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ चा समारोप प्रसंगी ते बोलत होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे  सोहळ्यास उपस्थित राहत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

श्री. ताह म्हणाले, खाणकामाची वैज्ञानिक आणि पद्धतशीर संकल्पना नसल्यामुळे अनेक अपघात आणि आपत्ती घडायच्या, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व्हायची. परंतु, सर्वांच्या प्रयत्नांमुळे आणि बदलत्या परिस्थितीनुसार खाण सुरक्षा नियम आणि नियमावलीच्या अंमलबजावणीमुळे तसेच आपत्ती व्यवस्थापन योजनेबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे आपल्याला मोठे यश मिळाले आहे. परंतू, आपण इथेच समाधानी राहून चालणार नाही. आपले उद्दिष्ट 'झिरो हार्म' हे आहे असं मत त्यांनी व्यक्त केले‌.


गोवा राज्यातील सन ग्रेस गार्डन, फोंडा गोवा येथे १५ मे रोजी वार्षिक खाण सुरक्षा सप्ताह मोठ्या दिमाखात झाला. गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी या खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेच आयोजन फोमेंतो रिसोर्सच्या माध्यमातून करण्यात आले होते. गोवा, सिंधुदुर्ग व कोल्हापूर येथील खाण मालकांसह या क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आयोजित खाण सुरक्षेबाबतच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मुख्य कार्यक्रमास वंदे मातरम् व खाण सुरक्षा गीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच स्थानिक कलावंतांकडून गणेश वंदना करण्यात आली.  यावेळी खाण सुरक्षा उप महासंचालक रामावतार मीना, खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष राजीव कुमार, खाण सुरक्षा संचालक, गोवा विभाग आणि खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेचे संयोजक रमेश वालिकर, खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद उत्पादकता सचिव संदीप मोरजकर, आफताब हुसेन, विरेशकुमार जगदीश, टी. श्रीनिवास, पी.के. जैन आदी उपस्थित होते.


याप्रसंगी खाण सुरक्षा उप महासंचालक रामावतार मीना यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, २०१६-१७ ला सुरक्षा सप्ताह झाला. २०१८ नंतर मायनिंग काही काळ बंद होत. आता बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा खाण सुरक्षा सप्ताह होत आहे याचा आनंद होतोय असे प्रतिपादन खाण सुरक्षा उप महासंचालक रामावतार मीना यांनी करत फोमेंतो प्रा. लिमिटेडला या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. या परिषदेत सचिव संदीप मोरजकर यांनी अहवाल सादर केला. मान्यवर परिचय व प्रास्ताविक विरेशकुमार यांनी केलं. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते विशेष पुस्तिकेच प्रकाशन करण्यात आले. संयोजक रमेश वालीकर, अध्यक्ष राजीव‌ कुमार यांनी मनोगत व्यक्त केली. ४२ व्या खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेचा समारोपाचे औचित्य साधून विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच गोव्याच्या परंपरेशी जोडलेले नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. यानंतर खाण क्षेत्रातील विविध विभागात प्राविण्य प्राप्त केलेल्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रगीताने या परिषदेचा समारोप करण्यात आला.