
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती निवडीसाठी पहिल्या बैठका २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनच्या ग्राम विकास विभागामार्फत यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले. हा आदेश रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १२ जिल्हा परिषद व त्यांच्या अंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानुसार आता अध्यक्ष व सभापती पदांच्या निवडीसाठी संबंधित संस्थांची पहिली बैठक घेणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनंतर या निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार या बैठका वेळेत घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव महाडू आसोले यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रानुसार सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींचे पालन करून नियोजित वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तास्थापनेची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.











