
सिंधुदुर्गनगरी : आंब्याच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णूू प्रसाद डिल्ली कृष्ण न्यौपाने (६०) सध्या रा. कोचरा, वेंगुर्ला मूळ रा. नायरनमतलेस, पाल्पा, नेपाळ याला दोषी ठरवत विशेष न्यायाधीश श्रीम. व्हि. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यातील ५ हजार रुपये रक्कम पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
पीडित अल्पवयीन मुलगी ही ५ मार्च २०२५ रोजी आरोपी विष्णू यांच्याकडे मोबाईलवर कार्टून पाहण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने पीडितेला जेवण देऊन दुपारी जंगलमय भागातील बागेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगू नये आणि सांगल्यास मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या सांगण्यावरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात ७ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, पीडिताची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायालयाने आरोपी विष्णू प्रसाद याला विविध कलमांखाली दोषी ठरवत २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यातील ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.










