
सिंधुदुर्गनगरी : प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 66 वर स्लीपर बसांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांच्या नेतृत्वात पार पडली. तपासणीदरम्यान स्लीपर बसमधील परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, कर भरणा, चालक परवाना आदी आवश्यक कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात आली. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ कोणताही अडथळा नसल्याची खात्री करण्यात आली. बसमध्ये अग्निशामक यंत्रणा उपलब्ध आहे का, ती कार्यक्षम स्थितीत आहे का, तसेच स्लीपर केबिनमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची सखोल पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, संकेत सोमणाचे, पराग मातोंडकर, प्रीतम जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. चालक सिद्धाराम स्वामी व रामदास पाखरे यांनीही सहकार्य केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, सर्व वाहनचालक व मालकांनी वाहतूक तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.










