
सिंधुदुर्गनगरी : गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्यावरील चुकीच्या पद्धतीने आणि स्वार्थ बुद्धीने सदस्यांनी घातलेला अविश्वास ठराव मतदार ग्रामस्थांनी फेटाळून लावत महिला सरपंचाचा सन्मान राखला आहे. यापुढेही सरपंचांच्या व शिंदे सेनेच्या पाठीशी राहून गांवराई गावचा सर्वांगीण विकास करून घ्या.त्यासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी विजयोत्सव कार्यक्रमात केले.
कुडाळ तालुक्यातील गांवराई ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सोनल शिरोडकर यांच्यावर उपसरपंचांसह सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष ग्रामसभा घेऊन मतदान प्रक्रिया घेतली होती. यामध्ये गांवराई ग्रामस्थांनी सरपंचावरील अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करून त्यांचे पद अबाधित ठेवले.या निमित्त गांवराई गडकर वाडी येथील मैदानावर ग्रामस्थ व शिंदे सेनेच्या वतीने रविवारी विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार निलेश राणे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आग्रे, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, संजय पडते, कसाल सरपंच राजन परब ,रानबाबूळी सरपंच परशुराम परब, मालवण तालुका युवा सेना प्रमुख स्वप्निल गावडे, गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व गांवराई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सरपंच सोनल शिरोडकर यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळून लावत ग्रामस्थांनी सत्याच्या बाजूने मतदान केले. अशा सर्व मतदार ग्रामस्थांचे कौतुक केले. तर यापुढेही सरपंचांच्या पाठीशी राहून गावचा विकास करून घ्या. या गावच्या विकासासाठी कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही .अशीच एकजूट दाखवून गावच्या विकासात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले तर यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, संजय आंग्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावराई ग्रामस्थांचे कौतुक करत यापुढेही गावाच्या विकासासाठी शिंदे सेनेच्या व सरपंचांच्या पाठीशी राहून साथ द्या. आम्ही येथील विकासात कुठेही कमी पडणार नाही. असे सांगितले.
गावराई येथे आयोजित विजयोत्सव कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये होम मिनिस्टर, गजा नृत्य, दशावतारी नाटक असे कार्यक्रम पार पडले तर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शिवसेना शाखाप्रमुख सिद्धेश राऊत, महिला सेना शाखाप्रमुख अक्षता राणे ,युवा सेना शाखाप्रमुख सचिन कदम, युवती सेना शाखाप्रमुख प्रांजल राऊत यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत त्यांचे स्वागत केले. तसेच होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम विजेती ठरलेल्या वैभवी शेलटकर, उपविजेत्या ठरलेल्या अन्वी राऊत ,तृप्ती कदम, शितल राऊत, समीक्षा गावडे, यांना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पैठणी देत त्यांना सन्मानित केले.










