
सिंधुदुर्ग : विकसित भारताची पुढची पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना शालेय वयापासूनच अर्थ साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवून 'फायनान्शियल फ्रीडम मूव्हमेंट' (Financial Freedom Movement) या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाने कोकणातील तब्बल ३००० हून अधिक विद्यार्थ्यांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
ग्रोथ बफे पार्टनर्स (Growth Buffet Partners) आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल शेपर्स ठाणे हब मंचाच्या संयुक्त विद्यमाने ही संकल्पना साकारण्यात आली असून, कोकणातील आयोजक म्हणून सानिका सावंत आणि रुचिरा सावंत यांनी जबाबदारी पार पाडली. मनस्वी पेंढारी, हर्षिता जोशी, आणि मानिनी बाईत यांनी मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) तत्त्वांना अनुसरून, विद्यार्थ्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे मूलभूत आर्थिक कौशल्य शिकवतो.
सोपी भाषा व दैनंदिन उदाहरणे: इयत्ता पाचवीपासून पुढे असलेल्या विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत, त्यांच्या अवतीभोवतीच्या उदाहरणांचा, दैनंदिन जीवनातील सवयींचा दाखल देत पैसे म्हणजे काय पासून ते गुंतवणुकीचे योग्य मार्ग कोणते इथपर्यंत अनेक गोष्टी समजावून सांगितल्या गेल्या.
जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम: हा अभ्यासक्रम वॉरन बफे यांच्या भारतातील मॅनेजर्सपैकी एक डॉ. प्रकाश जैन यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय मान्यता: अभ्यासक्रमाला युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पॅरिस या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. मोफत अंमलबजावणी: हा सशुल्क अभ्यासक्रम असला तरी, 'फायनान्शियल फ्रीडम मूव्हमेंट' अंतर्गत निवडक शिक्षण संस्थांमध्ये तो मोफत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत देशभरात जवळपास ५००० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, ज्यात कोकणातील ३०००+ विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.
कोकणातील यशस्वी प्रशिक्षण फेरी
सोमवार दिनांक १० नोव्हेंबर ते सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर या ७ दिवसांच्या काळात कोकणातील पुढील ११ शिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, प्रशिक्षण एका ठिकाणी आयोजित न करता, प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये स्वतंत्रपणे आयोजित केले गेले.
| अ.क्र. | शिक्षण संस्थेचे नाव |
| १ | शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे |
| २ | नरडवे इंग्लिश हायस्कूल, नरडवे |
| ३ | माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी |
| ४ | त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे |
| ५ | सौ. इंदिराबाई दत्तात्रेय वर्दम हायस्कूल, पोइप |
| ६ | आयडियल इंग्लिश स्कूल, कणकवली |
| ७ | माध्यमिक विद्यालय, उंबरडे |
| ८ | न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, फोंडा घाट |
| ९ | बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली |
| १० | प्रगत विद्यामंदिर, रामगड |
| ११ | छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, ओरोस |
या उपक्रमाने कोकण विभागातील विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे बीज पेरून, त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याच्या दिशेने पहिले आणि महत्त्वाचे पाऊल टाकण्यास मदत केली आहे.










