रहा तणावमुक्त..बनवा स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक !

'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग': कोकण व कोल्हापूर बोर्डाचा प्रेरणादायी, दिशादर्शक ऑनलाईन कार्यक्रम
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 17, 2025 11:34 AM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी : बोर्डाच्या परीक्षा केवळ अभ्यासक्रमाशी निगडित नसते, तर  त्यातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास व संयमांची आव्हानात्मक पडताळणी होत असते. नेमके हेच आव्हान पेलण्यासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि जिल्हा मुख्याध्यापक संघांच्या संयुक्त विद्यमाने 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे' या अनोख्या पहिल्या ऑनलाइन कार्यक्रमाचे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले.

विभागीय मंडळाकडून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक नियोजन पुस्तकेस अनुसरून हा ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी राज्यातील हा एक महत्त्वपूर्ण आणि वेगळा प्रयोग असून, बोर्डाच्या तयारीसाठी विविध विषयांवर टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करण्याची ही नवी दिशा आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण YouTube वर लाईव्ह करण्यात आले, ज्यामुळे विभागातील हजारो विद्यार्थी, शिक्षक व पालकांना एकाच वेळी या ज्ञानाच्या प्रवाहात सहभागी होता आले. कोल्हापूर शैक्षणिक विभागातील पाचही माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक संघ 'कॉपीमुक्तीसाठी' एकवटले आहेत, हे या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. परीक्षा कामकाजात आणि निकालात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमातून सर्वसमावेशक प्रयत्न होताना दिसत आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश क्षीरसागर (अध्यक्ष, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ) होते आणि त्यांनीच या उपक्रमाचा दूरगामी हेतू स्पष्ट केला. या ऑनलाइन मंचावर कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले, कोकण विभागीय सचिव पुनिता गुरव, कोल्हापूर विभागीय सहसचिव बसवेश्वर किल्लेदार, सहाय्यक सचिव गजानन उकिरडे  उपस्थित होते. शिवाय कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सातारा उपशिक्षणाधिकारी शिवाजी मलदोडे, रत्नागिरीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी कविता शिंपी आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

१. तणावाचे संतुलन आणि यशाचा मार्ग (मार्गदर्शक: कपिल लळीत – मानस तज्ज्ञ)

मानस तज्ज्ञ कपिल लळीत यांनी विद्यार्थ्यांना तणावाच्या मनःस्थितीचे विश्लेषण केले. अति तणाव किंवा अजिबात तणाव नसणे, या दोन्ही स्थिती हानिकारक असून, विद्यार्थ्यांसाठी संतुलित तणाव आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सकारात्मक ऊर्जा: यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत. 'माझे मूल्य माझ्या गुणांवरून ठरत नाही' हे समजून घेऊन तयारी करावी आणि आठवण्यासाठी युक्त्यांचा वापर करावा. तणावाची लक्षणे: डोकेदुखी, धाप लागणे (शारीरिक बदल), तसेच अभ्यास टाळणे, मोबाईल/गेम्समध्ये वेळ घालवणे, घुमेपणाने बसणे (वागण्यातील बदल) या लक्षणांवर त्वरित नियंत्रण मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले.

अचूक अभ्यास पद्धती: त्यांनी चार महत्त्वाच्या पद्धतींवर जोर दिला: ८०% उजळणी आणि २०% नवीन अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, पोमोडोरो तंत्र (२५ मिनिटे अभ्यास + ५ मिनिटे ब्रेक), स्पेस रेपिटेशन (ठराविक अंतराने उजळणी), आणि फेनमन तंत्र (शिकलेले लहान मुलांना समजावून सांगणे).

२. डिजिटल युगातील बोर्डाच्या सुविधा (मार्गदर्शक: रुपेश इराबत्ती, पुणे)

रुपेश इराबत्ती यांनी 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग' उपक्रमांतर्गत राज्य व विभागीय मंडळाच्या डिजिटल सुविधांची माहिती दिली.

महत्त्वाची संकेतस्थळे: राज्यमंडळ (https://www.mahahsscboard.in/) आणि कोल्हापूर विभागीय मंडळ (http://www.sscboardkolhapur.in/) ही संकेतस्थळे माहितीचा मुख्य स्रोत आहेत.

ऑनलाइन सेवा: १०वी व १२वी परीक्षा निकाल, वेळापत्रक, नमुना प्रश्नपत्रिका, HSC INSPIRE, खाजगी विद्यार्थी फॉर्म (Form 17), डुप्लिकेट मार्कशीट/प्रमाणपत्रे, उत्तरपत्रिका Verification/Photocopy/Revaluation साठी ऑनलाइन अर्ज, आणि स्थलांतर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लिंक उपलब्ध आहेत.

डिजिटल क्रांती: eMarksheet पोर्टलद्वारे गुणांचे ऑनलाइन सत्यापन आणि MSBSHSC ॲप (Play Store वर उपलब्ध) यामुळे विद्यार्थ्यांची आणि प्रशासनाची कामे त्वरित व सोपी झाली आहेत. DigiLocker आणि State PARAKH संबंधित लिंक्स देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

३. यशाचे सूत्रबद्ध वेळापत्रक (मार्गदर्शक: वैभव लक्ष्मण उमरदंड)

वैभव लक्ष्मण उमरदंड यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ असताना वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचे 'सूत्रबद्ध नियोजन' दिले.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) च्या लेखी परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी, २०२६ पासून सुरू होणार आहेत (प्रात्यक्षिक २३ जानेवारी २०२६ पासून). म्हणजे विद्यार्थ्यांकडे नियोजनासाठी सुमारे ३ महिन्यांचा महत्त्वपूर्ण कालावधी शिल्लक आहे.

अभ्यास नियोजनाचे वेळापत्रक :

एकाग्रता वेळ: पहाटे ५.०० ते ७.०० ही अभ्यासासाठीची सर्वोत्तम वेळ आहे.

परीक्षा सराव: सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत घरी बसून उत्तरपत्रिका लेखनाचा सराव करणे आवश्यक आहे, जेणेकरून परीक्षेच्या वेळेत पेपर पूर्ण करण्याची सवय लागेल.

विश्रांती आणि उजळणी: सायंकाळी ५.०० ते ६.३० या वेळेत खेळ आणि रात्री ६.३० ते ८.०० या वेळेत नियमित उजळणी (Revision) करावी.

लेखन कौशल्ये: रात्री ९.०० ते ११.०० या वेळेत जास्तीत जास्त लेखन सराव (Writing Practice) करावा. तंत्रज्ञानाचा वापर: रात्री ८.३० ते ९.०० या वेळेत शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ देण्याचे त्यांनी सुचवले. विद्यार्थ्यांनी उर्वरित कालावधीसाठी स्वतःचे वेळापत्रक बनवणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सुतार यांनी  केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी मानले.