उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक : जिल्हाधिकारी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 10, 2025 18:43 PM
views 75  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर नगर पंचायत कणकवली सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या (MCMC) माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 3 नगर परिषदेसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि 1 नगर पंचायतसाठी (कणकवली) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्याव्यतिरिक्त) आदेश व सूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११ अंक 32, गुरुवार, ऑक्टोबर 9, 2025/ 17, शके 1947 यानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. 

इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, ), संकेतस्थळे आदींचा समावेश होतो. समाजमाध्यमे (सोशल मीडिया, यात इंटरनेटद्वारे वापरली जाणारी संवादाची आणि माहितीची अशी व्यासपीठे की ज्याद्वारे लोक एकमेकांशी संवाद साधतात. माहिती शेअर करतात. प्रतिक्रिया व्यक्त करतात, मते किंवा विचार मांडतात आणि विविध प्रकारची माहिती (फोटो, व्हीडिओ, लेख, बातम्या), इतरांपर्यंत पोहोचवतात. उदा. एक्स (पूर्वीचे ट्विटर), व्हीडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मस (उदा. फेसबुक, लिंक्डइन इ.), मायक्रो ब्लॉगिंग साइटस, मेसेजिंग ॲप्स (उदा. व्हॉटसॲप, टेलिग्राम), तसेच कोलॅबोरेटिव्ह टूल्स (उदा. विकी डिस्कशन फोरम्स) इत्यादींचा समावेश होतो. 

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत-

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या समितीच्या अध्यक्ष आहेत. समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे आहेत.याशिवाय या समितीत सदस्य म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला व नगरपंचायत कणकवली, मुख्याधिकारी नगरपरिषद सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला व नगरपंचायत कणकवली हे असणार आहेत. 

या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, पहिला मजला, ओरोस,  सिंधुदुर्गनगरीयांच्याकडे सादर कराव्यात. प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्व प्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल. पूर्व प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडाव्यात, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले आहे.