महाराष्ट्रीयन पंतप्रधानासाठी तामिळ भाषिकाची भ्रमंती

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 07, 2025 18:25 PM
views 15  views

सिंधुदुर्गनगरी : हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेला. ही युक्ती आपल्याकडे प्रसिद्ध आहे. देशावर ज्या ज्या वेळी संकट आली त्या त्या वेळी मराठी माणूस दिल्लीच्या मदतीसाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. मात्र आजवर देशाचा पंतप्रधान मराठी माणूस बनू शकला नाही. पुढील पंतप्रधान महाराष्ट्रीयन बनावा यासाठी डोंबिवलीतील एका तामिळ भाषिकाने जनजागृती करत राज्य भ्रमंती सुरू केली आहे. शिवा के अय्यर असे त्यांचे नाव आहे. आज त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारांच्या भेटी घेत आपली मागणी व्यक्त केली.

अय्यर हे तमिळ भाषिक आहेत. मात्र गेल्या ५० वर्षापासून ते डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत. आता महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी झाल्याने येथील मराठी माणूस आणि राज्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आस्था आहे. दरम्यान पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावर त्यांनी राज्यभर जनजागृती मोहीम सुरू केली आहे. एका मोठ्या फलकावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह संसदेचे छायाचित्र दाखवत त्यावर भारताचा पुढील पंतप्रधान महाराष्ट्रीयन असावा असा उल्लेख केला आहे. 

उत्तर प्रदेश ला ११ वेळा आणि गुजरातला चार वेळा पंतप्रधानांचे पद मिळाले. पंतप्रधानाची नियुक्ती रोटेशन नुसार करावी अशी ही मागणी प्रसिद्धी पत्रकार द्वारे व्यक्त केली आहे. दरम्यान एसटी आणि रेल्वेने प्रवास करत ते जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे टेशन आणि बस स्थानकात आदी ठिकाणी नागरिकांना फलक दाखवत जनजागृती करत आहेत. या मोहिमेत अय्यर यांच्यासोबत विनय नांदुरकर सहभागी झाले आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या पंतप्रधान पदाची माळ अमराठी माणसाच्याच गळ्यात पडली आहे. महाराष्ट्र या पंतप्रधान पदासाठी पात्र नाही का? असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला आहे. जर खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर एखादे राज्य अनेकदा पंतप्रधान पद भूषवित असेल ते इतर राज्यांसाठी ते योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या जागतिक नकाशावरील विकसित राज्यावर तो अन्याय आहे असे अय्यर म्हणाले.