नगरपरिषद - नगरपंचायतीसाठी एवढे मतदार करणार मतदान : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 07, 2025 16:07 PM
views 30  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सावंतवाडी,मालवण,वेंगुर्ला या नगरपरिषद व कणकवली नगरपंचायतीसाठी ७४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या निवडणुकीसाठी ५७ हजार २०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २७५ दुबार व तिबार मतदार आढळले आहेत. दरम्यान जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्पष्ट करत निवडणूक शांततेत होईल याची दक्षता घेतली जाईल असे पत्रकार परिषदेत सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंधकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते.

जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, जिल्ह्यात ३ नगरपरिषद व एका नगरपंचायत साठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी ७४ मतदानकेंद्र निश्चित करण्यात आली असून एकूण५७ हजार २०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २७ हजार ६९७ पुरुष तर २९ हजार ५१० महिला मतदार आहेत. सावंतवाडी नगरपरिषद मध्ये २१ मतदान केंद्र असून ९ हजार ४११ पुरुष तर १० हजार ८ महिला मतदार असे एकूण १९ हजार ४२९ मतदार आहेत. मालवण नगरपरिषद मध्ये २० मतदान केंद निश्चित केली असून ६ हजार ९८२ पुरुष तर ७ हजार ४०३ स्त्री असे एकूण १४ हजार ३८५ मतदार आहेत. वेंगुर्ला नगरपरिषद मध्ये १६ केंद्र असून ४ हजार ८७१ पुरुष तर५ हजार २४४ स्त्री मतदार असे एकूण १० हजार ११५ मतदार आहेत. कणकवली नगरपंचायत मध्ये १७ मतदान केंद्रे निश्चित झाले असून ६ हजार ४३३ पुरुष व ६ हजार ८४५ महिला मतदार असून एकूण १३ हजार २७८ मतदार आहेत.

या चारही ठिकाणच्या केंद्रातील दुबार व तिबार मतदारांची सखोल तपासणी केली. यादरम्यान २७५ मतदार असे आढळून आले की त्यांची नावे ५५७ ठिकाणी आढळून आले आहेत. परंतु २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारे अवैध मतदान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले. मतदान स्थळी सर्व सुविधा उपलब्ध असतील, त्यामध्ये पक्क्या इमारती, वीज,पाणी यांचा समावेश असेल. निवडणूक शांततेत होईल असे सांगत जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.

खर्च मर्यादा !

उमेदवारांच्या खर्च मर्यादेबाबत विचारले असता जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, आपल्याकडे होणाऱ्या निवडणुका या क वर्गात येतात. नगरपरिषद साठी नगराध्यक्ष पदासाठी ७ लाख ५० हजार व सदस्य पदासाठी २ लाख ५० हजार रू खर्च मर्यादा राहणार आहे. तर नगरपंचायत साठी नगराध्यक्ष पदासाठी ६ लाख व सदस्य पदासाठी २ लाख २५ हजार रू खर्च मर्यादा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

तर काळजी घ्यावी..!

ज्या कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आहे अशाच ठिकाणी आचारसंहिता आहे मात्र या नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रात निवडणूक होणार आहे या क्षेत्रातील मतदार प्रभावित होतील अशी वक्तव्य इतर ठिकाणी होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे स्पष्ट निकष असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.