
सिंधुदुर्गनगरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद जठार यांची नियुक्ती करण्यात आली असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ही घोषणा भाजप प्रदेश कार्यालयाकडून ५ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली. राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांसाठी अशा नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर पक्षाची निवडणूक रणनीती प्रभावीपणे राबविणे, संघटन उभारणीला गती देणे आणि निवडणुकीची तयारी मजबूत करणे ही जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी पक्ष यंत्रणा सज्ज होत असून, प्रचार आणि जनसंपर्क मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.










