
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील गावराई येथील टेंबवाडी, कुळकरवाडी, थळकरवाडी येथील ठाकरे सेनेच्या विविध कार्यकर्त्यांनी तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करून गावच्या विकास कामासाठी आमदार निलेश राणे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गावराई शाखाप्रमुख किसन चिंदरकर, मालवण युवा तालुका प्रमुख स्वप्निल गावडे, राजन परब, परशुराम परब यांच्यासह तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेश कार्यक्रमात भाजपचे ग्रामपंचायत सदस्य प्रणिता मेस्त्री, जयसिंग वेंगुर्लेकर, अमित राणे, गोट्या मेस्त्री, बबन मेस्त्री, यांच्यासह उद्धव ठाकरे सेनेचे रुपेश गावडे, सतीश गावडे, सचिन गावडे, जानू गावडे, गजानन पावसकर,अनु गावडे, गोपाळ हळदणकर, गोविंद फाले याच्यासह सुमारे ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.
गावराई गावामध्ये गेली दहा वर्ष विकास कामे झाली नाहीत. गावराई ग्रामपंचायत ते प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, टेंबवाडी कुळकरवाडी, थळकरवाडी कडे जाणारा मुख्यरस्ता वाहतुकिस अतिशय धोकादायक बनला आहे. या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण व्हावे यासाठी गेली दहा वर्ष प्रयत्न करूनही तसेच अनेक वेळा तत्कालीन आमदारांचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केला गेला.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीकडे प्रेरित होऊन त्यांच्यामार्फत या रस्त्याचे काम तसेच उर्वरित विकास कामे होऊ शकतील अशी आशा व्यक्त करत येथील भाजप व उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. तर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामपंचायत ते टेंबवाडी, कुळकरवाडी, थळकरवाडी मुख्य रस्त्याच्या कामासह अन्य विकास कामेही टप्प्याटप्प्याने पुढील दोन वर्षात पूर्ण केली जातील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांना दिला.