
सिंधुदुर्गनगरी : फोंडाघाट ग्रामपंचायत कडून शासकीय धर्मशाळेच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. याबाबत तक्रार करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी फोंडाघाट बिजलीनगर येथील समीर सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कणकवली तालुक्यातील फोंडा घाट येथील समीर सदानंद सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन फोंडा घाट ग्रामपंचायत कडून शासकीय जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. या बांधकामासाठी शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला आहे. ग्रामपंचायत इमारत बांधकाम, कंपाउंड वॉल बांधताना आवश्यक असलेल्या कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाची ना हरकत घेतलेली नाही. तसेच तहसीलदार कणकवली यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या अखतारित असलेल्या जागेची भूमि अभिलेख मार्फत मोजणी करून घेऊन सरकारी धर्मशाळेच्या जागेत अतिक्रमण होत असल्यास सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या अनुषंगाने अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी राज्य मार्ग दर्जाच्या रस्त्याच्या लगत कोणतेही नवीन बांधकाम करताना नियमानुसार आवश्यक ते अंतर ठेवणे आवश्यक आहे. मात्र फोंडाघाट ग्रामपंचायतीने ही दक्षता न घेतल्यामुळे पथकिनारर्वती नियमांचा भंग झाला आहे. सदर बांधकाम अनधिकृत ठरत असल्याचे लेखी ग्रामपंचायतला कळविलेले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने समीर सामंत यांनी संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.