
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर आहे. प्रशासनामध्ये AI चा प्रथम वापर करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून घेण्यात आली असून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ए.आय. वापराचे सादरीकरण आयोगासमोर करण्यात येणार आहे. ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी शेती, आरोग्य, पोलीस अशा सर्व विभागांकडून होत असलेल्या ए.आय. वापराचा सविस्तर आढावा घेतला आणि त्याला आणखी गती देण्याचे निर्देश दिले. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण भाग असूनही तंत्रज्ञानातील प्रगत पावले उचलत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे हे पाऊल देशपातळीवर आदर्श ठरणार असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या व्यवस्थापनासाठी हवामानाची वेळेवर व अचूक माहिती मिळावी, त्याचा अचूक अंदाज घेऊन योग्य ती पावले उचलता यावीत, यासाठी ए.आय. प्रणाली महत्वाची ठरणार आहे. AI प्रणालीमुळे जिल्ह्यातील सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ए.आय. वापरात येणाऱ्या तांत्रिक अडचणी मांडल्या. त्यावर मार्वल कंपनीचे प्रतिनिधी श्रीकृष्णन यांनी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करून या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी गुन्हेगारी नियंत्रण व माहिती व्यवस्थापनासाठी पोलीस दलामध्ये राबविल्या जात असलेल्या ए.आय. प्रणालीच्या उपयोगाबद्दल माहिती दिली.