
सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. आता राज्य शासनाने १५० दिवसांच्या कृति आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला आहे. या अनुषंगाने सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा कराव्यात तसेच या अभियानामध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत काम करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या अभियानाच्या अनुषंगाने शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले की, या अभियानांतर्गत सर्व विभागांनी तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी ई - प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करुन कार्यालय नागरिकांना सोईचे कसे होईल यासाठी विशेष सुविधा पुरविणे अपेक्षित आहे. शासन आणि नागरिकांमधील संवाद वाढविणे आवश्यक आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अभियानात आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन काम करावे. निकषाला अनुसरुन जास्तीत जास्त गुण कसे मिळतील यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सादरीकरणाव्दारे या अभियानाची रुपरेषा, उद्दिष्ट्ये आणि जिल्ह्याची प्रगती सांगितली. या अभियानाच्या निकषानुसार संकेतस्थळ अद्ययावतीकरण, आपले सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा, ई-ऑफिस प्रणाली, डॅशबोर्ड, नाविन्यपुर्ण वेब ॲप्लिकेशनबाबतची सद्यस्थितीबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.