
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापने मध्ये ओरोस ग्रामपंचायतीचा समावेश करावा की न करावा यासाठी ओरोस ग्रामपंचायतीने आज आयोजित केलेल्या ग्रामसभेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी ग्रामसभेने आवाजी बहुमताने सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी आणि त्यामध्ये ओरोस गावचा समावेश करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
ओरोस सरपंच अशा मुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस श्री देव रवळनाथ रंगमंच सभा मंडपात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पांडुरंग मालणकर, ग्रामविकास अधिकारी सरिता धामापूरकर, सर्व ग्रामपचायत सदस्य ,माजी पंचायत समिती सदस्यां सुप्रिया वलावलकर, माजी सरपंच प्रमोद परब, प्रीती देसाई, आनंद उर्फ भाई सावंत,उदयकुमार जांभवडेकर ,संतोष वालावलकर, महेश उर्फ छोटू पारकर, प्रकाश जैतापकर, नागेश ओरोसकर , प्रकाश देसाई, बबन सावंत, शेखर सावंत, सतीश लळीत , अरविंद सावंत,आदेश नाईक आदी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेसाठी ओरोस ,रांनबांबूळी आणि अणाव ग्रामपंचायतीने ठराव घेण्याकरिता खास ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढताच ओरोस ग्रामपचायतीने नगरपंचायत स्थापनेसाठी आज मंगळवारी खास ग्रामसेभेचे आयोजन केले होते.
जिल्ह्या मुख्यालयाची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी मध्ये ओरोस ,रांनबांबूळी आणि अणाव या तीन गावांचा समावेश आहे वाढती नागरी वस्ती व अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन तिन्ही गावांचा समावेश असलेल्या सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेचा प्रस्ताव 2016 मध्ये शासनाला सादर केला त्याची प्रारूप प्रसिद्धीही झाली होती अगदी मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेत अडकली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून नागरिकाकडून सांतत्याने नगरपंचायत स्थापन करण्याची मागणी सुरु होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फेर प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आणि जिल्हाधिकऱ्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकारणच्या झालेल्या सभेत सिंधुदुर्गनगरी प्राधिकारणसह ओरोस ,रांनबांबूळी आणि अणाव तिन्ही गावाचा समावेश करून नगरपंचायत स्थापन करण्यासाठी शासनाला फेर प्रस्ताव सादर करण्यासाठी तिन्ही गावांनी ग्रामसभा घेऊन नगरपंचायत स्थापने बाबत ठराव घेण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे तिन्ही ग्रामपंचायतीना कळविण्यात आले आहे.
त्यानंतर ओरोस ग्रामपचायतीने नगरपंचायत स्थापनेसाठी ग्रामसेभेचे आयोजन केले होते. या सभेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सभेच्या सुरुवातीला ग्रामसभा सचिव सरिता धामपूरकर यांनी सभा आयोजनाचा उद्देश सांगितला त्यानंतर ग्रामस्थ सतीश लळीत यांनी बोलताना विकासाच्या दृष्टीने नगरपंचायत होणे आवश्यक आहे, त्यामुळे सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी आणि त्यामध्ये ओरोस गावाचा समावेश करण्यात यावा असा ठराव मांडला. या ठरावाला उदयकुमार जांभवडेकर यांनी अनुमोदन देताच ग्रामस्थांनी हात वर करत आवाजी बहुमतदानाने ठराव मंजूर केला व सरपंच आशा मुरमुरे यांनीही ठराव मंजूर केला. दरम्यान, सभा संपल्यानंतर ठराव करण्यावरून ग्रामस्थांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.