कुणकेश्वरमध्ये महाशिवरात्रीला लेझर शोचं आयोजन

Edited by:
Published on: February 24, 2025 15:13 PM
views 321  views

देवगड : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने  यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो चे आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली आहे.

लेझर शो हे यात्रेचे मुख्य आकर्षण असून,भाविकांना या शोच्या माध्यमातून शिवाचे भव्य दर्शन घडवण्याचा मानस नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. हा अनोखा अनुभव मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या लेझर शोमुळे यात्रेत आलेले भाविक अधिक काळ थांबतील आणि हा अद्भुत अनुभव घेऊ शकतील, अशी अपेक्षा संदीप साटम यांनी व्यक्त केली आहे.

महाशिवरात्री यात्रा भव्य दिव्य आणि सुरक्षित व्हावी यासाठी संपूर्ण प्रशासन नामदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. कुणकेश्वर ग्रामपंचायत व कुणकेश्वर ट्रस्टही या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा विशेष लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.

भव्य दिव्य लेझर शो – विशेष आकर्षण

महाशिवरात्रीच्या निमित्ताने यंदा कुणकेश्वर, देवगड येथे सुप्रसिद्ध आर. के. लेझर आणि अमित पाटील यांच्या टीमकडून भव्य लेझर शोचे सादरीकरण होणार आहे. या टीमने याआधी अहमदाबाद वर्ल्ड कप फाइनल, अरिजित सिंग लाइव (पुणे), जामखेड किल्ला शो आणि प्रयागराज कुंभ मेळा यांसारख्या भव्य कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

भाविकांना २५ व २६ फेब्रुवारीच्या सायंकाळी हा नेत्रदीपक शो पाहण्याची संधी मिळणार आहे. यात ‘शिवतांडव’ व ‘बीम शो’ असे दोन विशेष सादरीकरणे करण्यात येणार आहेत.सर्व शिवभक्तांनी या भव्य दिव्य लेझर शोचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.