
सावर्डे-चिपळूण : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी व माजी खासदार स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त दि. 20 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान विविध सांस्कृतिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये रांगोळी प्रदर्शन, पुष्प रचना ,सॅलड डेकोरेशन, फेस पेंटिंग ,उद्यान विद्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजेच कोकेडामा डेकोरेशन, बेस्ट फ्राॅम वेस्ट व आकर्षक अशा शोभिवंत रोपांचे प्रदर्शन यांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांचे उद्घाटन डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलसचिव व उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ.प्रदिप हळदवणेकर , कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पुजाताई निकम, वैशाली सुनितकुमार पाटील व उद्यान विद्या महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. योगेश परूळेकर यांचे हस्ते संपन्न झाले.
कृषि शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहित करणे हा या स्पर्धांचा प्रमुख उद्देश होता. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट अशा कलागुणांचे प्रदर्शन करण्यात आले . विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर साकारण्यात आलेल्या रांगोळी, कोकेडामा डेकोरेशन व शोभिवंत फुले व रोपांचे प्रदर्शन हे सर्वांचे प्रमुख आकर्षण ठरले.या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध शोभिवंत फुल झाडांची मोठ्या प्रमाणात विक्री देखील करण्यात आली. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व उपस्थित सर्व मान्यवरांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.