
कुडाळ : विज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस व इतर समाजसेवी संघटना यांच्या वतीने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात आज कुडाळात विराट धडक मोर्चा काढण्यात आला. विज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथील महात्मा गांधी चौक येथून महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये हा धडक मोर्चा नेण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विराट मोर्चाची दखल घेऊन महावितरण सिंधुदुर्ग मंडलचे अधीक्षक अभियंता यांनी अदानी एनर्जी सोल्युशन अहमदाबाद कंपनीशी पत्रव्यवहार करत कुडाळ व कणकवली विभागांतर्गत सुरू असलेले स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे कामकाज पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची प्रत आंदोलन कर्त्यांना देण्यात आली त्यानंतर हा धडक मोर्चा मागे घेण्यात आला.