
दोडामार्ग : तालुक्यातील चर्चेत असलेल्या सासोली ओरीजिन कंपनीच्या ताब्यात असलेल्या ' त्या ' सामायिक जमिनीची मोजणी अखेर प्रशासनाकडून सोमवारी पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्यात आली. दरम्यान जोपर्यंत पोटहिस्सा ठरत नाही तोपर्यंत आमच्या जमिनीत मोजणी करायची नाही, अशी जोरदार मागणी ओरीजीन कंपनीला विरोध करणाऱ्या मनोज ठाकूर व अन्य ग्रामस्थांनी स्वतःचे हात बांधून ठिय्या आंदोलन केले, मोजणी अधिकाऱ्यांना लेखी हरकतीहि दिल्या. मात्र पोलीस बंदोबस्तात सोमवारी त्या जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी आंदोलकांना शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी समजावण्याचा व त्यांचा प्रश्न निकाली काढून देण्याच्या दृष्टीने समजूत घातली. तर ऊबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी मनोज ठाकूर व विरोध करणाऱ्या लोकांचं समर्थन केलं.
सासोली येथील ओरिजीन कंपनीन खरेदी केलेल्या जमिनीची पोट हिस्सा प्रशासकीय मोजणी प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी जमीनीचा सर्वे करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख अधिकारी व ग्रामस्थ तसेच सहहीस्सेदार यांच्यातच शब्दिक बाचाबाची झाली. हे प्रकरण चिघळत असताना पोलीसांनी हस्तक्षेप करत प्रकरण मिटवले. मात्र पोलीस व महसूल, भूमी अभिलेख याच्यावर जमीन मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा रोष पहावयास मिळाला. सातत्याने या कंपनी आणि जमीन व्यवहार , मोजणी या विरोधात रान उठवणारे मनोज गवस व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनावेळी गेटच्या समोर जमिनीवर झोपूनही आंदोलन करत आपला राग व्यक्त केला. आमच्या उरावरून जा, आम्हाला मारा आणि मोजणी करा असा पवित्रा गवस यांनी घेतला. आमचा विरोध डावलून मोजणी कराल तर आम्ही आत्महत्या करू असा पवित्रा विरोधकानी घेतला होता. तर आम्ही कायदेशीर जमिनी खरेदी केल्या आहेत. कायदेशीर मोजणी प्रक्रिया मागणी केली आहे. असे असताना कोणाचा नाहक विरोध असेल आणि आपण मोजणी थांबवत असाल तर आम्हीही जमीन मालक आहोत आम्हालाही इथ आत्महत्या करावी लागेल. असा पवित्रा मोजणी मागणी कर्त्यांकडून करण्यात आला. त्यामुळे अखेर नियमानुसार विरोधकांचा विरोध बाजूला ठेवून मोजणी सुरू करून ती पुर्ण करण्यात आली. यावेळी विरोधक शेतकऱ्यांनी आपली हरकत लेखी स्वरूपात देत, तेथून निघून जाणं पसंत केलं.
नियमानुसार मोजणी झालीच पाहिजे : संजू परब
यावेळी सासोली येथील काहीजणांचा विरोध पाहून मोजणी साठी आलेले अधिकारी संभ्रमात होते. यावेळी संजू परब यांनी त्यांनी खडे बोल सुनावले. आपण मोजणी करण्यासाठी आलात की भजी खाण्यासाठी? असा मार्मिक सवाल उपस्थित करत संजू परब यांनी उपस्थित भूमी अभिलेखचे अधिकारी यांना जमिनीची मोजणीची मागणी केली आणि लागलीच जमीन मोजणीला सुरवात झाली.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार : संदेश पारकर
माझा कधी विकासकाला विरोध नाही, मात्र माझ्या शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनी हडपणाऱ्या अशा जमीन माफी्यांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयन्त करणार. पहिल्या पासून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि याही पुढे शेतकऱ्यांना न्याय मिळे पर्यंत त्यांच्या बाजूने राहणार असल्याचे पारकर म्हणाले.
जमिन मोजणी सुरवात केल्यानंतर त्याठिकाणी आलेल्या उबाठाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर व भूमी अभिलेखच्या अधिकारी व पोलीस यांच्यात हमरातुमरी झाली. यावेळी त्यांनी संबधित आणि प्रशासन यांचे साटेलोटे असल्याने अधिकारी या कंपनीच्या बाजूने बोलत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, या मोजणीची सूरवात होता असताना अनेकदा कंपनी प्रतिनिधि, मोजणी करणारे जमीन मालक तसेच विरोधक, अधिकारी उपस्थित राजकारणी यांच्यात अनेकदा शाब्दिक संघर्ष झाला. मात्र कंपनी प्रतिनिधि ऍड. महाजन यांनी याठिकाणी सामंजस्य भूमिका घेत. आपण यावेळी जमीन मोजणीची सर्व शासकिय सोपस्कार पूर्ण केले आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोध नको. आजची मोजणी करू द्या. जर आम्ही चुकीचं केलं असेल तर आपण हरकती नोंदवा. आम्हाला काहीच अडचण नाही. पण विरोध नको. आपल्या मागण्या सामज्यासाने मांडा, आम्ही नियम डावलून काहीही इथे करत नाही आहोत. मोजणी वेळी जर आपण आपल्या सीमा दाखवला असता तर कंपनी बरोबरच आपल्यालाही आपल्या जमनीचा पोट हिस्सा मिळवता आला असता. अशी भूमिका मांडली.
प्रशासनाने भूमिका जाहीर करणे आवश्यक....
सध्या सासोली ओरिजिन कंपनीचा जमीन प्रकरण प्रश्न जिल्हाभर गाजतो आहे. यात स्थानिक शेतकरी , भूमिपुत्र आपल्यावर अन्याय झाल्याने भूमिका योग्य आहे असे सांगत आहेत. तर संबधित कंपनी आम्ही कायदेशीर जमीन खरेदी, पुढील परवाने आणि अन्य बाबी करत आहोत, आम्ही कुणाचही नुकसान केलेलं नाही आणि करूही इच्छित नाही, जे नियमात आहे ते योग्य प्लॅटफॉर्मवर मांडा आम्ही सहकार्य करू अशी भूमिका मांडत आहे. त्यामुळे कोण बरोबर आणि कोण चूक याबाबत जनता मात्र बुचकळ्यात असून याचा क्लिअरनस आता प्रशासनानेच देणे आवश्यक आहे. जे योग्य आहेत त्यांच्या बाजूने प्रशासनाने ठाम पणे उभ राहणं आणि न्याय देणे आवश्यक आहे. कारण प्रश्न दोडामार्गच्या डेव्हलमेंट व विकासाचा आणि वेळोवेळी संघर्षाने होणाऱ्या बदनामीचा आहे.
.