उघड दार देवा आता...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 28, 2023 14:09 PM
views 403  views

सावंतवाडी : 'उघड दार देवा आता' अशी साद सावंतवाडीतील समस्यांच्या गर्तेत सापडलेले नागरीक घालत आहेत. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपून बराच अवधी लोटला आहे. न.प.च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागांच आरक्षण देखील दोनदा पडल होतं. परंतु, अद्याप निवडणुकांच बिगूल काही वाजत नाहीय. त्यामुळे सावंतवाडीकरांचे प्रश्न मार्गी लावणारे 'हक्काचा माणूस' नगरपरिषदेत नाहीत. प्रशासकीय राजवटीखाली न.प.चा कारभार चालत असल्यानं अनेक समस्यांना शहरवासीयांना तोंड द्यावे लागत असून सावंतवाडीकरांच्या हक्काचं दार गेले अनेक महिने बंद आहे. 

२०१६ ला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येत कार्यभार सांभाळला होता. साळगावकर यांच्या राजीनाम्यानंतर २०१९ ला लागलेल्या पोटनिवडणूकीत भाजपचे सच्चिदानंद उर्फ संजू परब नगराध्यक्ष झाले. त्यांनी ७२० दिवसांचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर आजमितीपर्यंत प्रशासकीय राजवट लागू आहे. यात एका मुख्याधिकारी यांची बदली होऊन दुसरे नुकतेच हजर झाले आहेत. प्रशासकीय राजवट असल्याने व नागरिकांचे सेवक सभागृहात नसल्यानं शहरवासीयांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. त्या समस्या पूर्णत्वास येत नाही आहेत. भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील त्यांच्या कारकिर्दीतील विकासकाम तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यामुळे रखडल्याचा आरोप केला होता. अद्याप ती काम कासव गतीनच सुरू आहेत. तर कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मोती तलाव काठावरील पुथपाथच काम न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी वृक्षारोपणाचा इशारा दिला आहे. तर माठेवाडा येथील डॉ. राजेश कार्लेकर यांनी माठेवाडा येथील पाणंद जीर्ण झालेली आहे. ज्याचा अर्ज मार्च महिन्यातच नगरपालिका सावंतवाडीकडे केलेला आहे. पावसाळ्यात या पाणंदीमध्ये पाणी साठते. भर पावसात साठलेल्या पाण्यातुन अटल प्रतिष्ठानच्या शिशुवाटिकेत येणा-या लहान मुलांना त्रास होत आहे. नगरपालिका प्रशासनाने यात लक्ष घालुन समस्येचे निराकरण करावे अशी विनंती केली आहे. अशा अनेकांच्या विविध समस्या असून हक्काचे नगरसेवक व नगराचा अध्यक्ष नसल्यानं त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


दरम्यान, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील सावंतवाडी शहराच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी शिंदे गटाचे शाखाप्रमुख असल्याप्रमाणे काम करू नये अस परखड मत व्यक्त केले आहे. लोक आमच्याकडे काम घेऊन येतात याचं कारण नगरपरिषदेमध्ये होत असलेला विलंब आहे. सावंतवाडीतील नागरिक सुजाण आहेत. अधिकार आहात म्हणून लोकांचे अपमान करू नका. एका छोट्या घरासाठी डेव्हलपमेंट चार्जेस भरूनही दोन-दोन महिने परवानगी हातात मिळत नाही याचा अर्थ काय ? या कामासाठी आम्ही फोन लावला तर तुम्हाला राजकारण वाटतं. वैयक्तिक घरांची परवानगीचा काम होणार नाही तर काय बिल्डिंगच्या कामासाठी तिथे मलिदा खाण्यासाठी बसलायत का ? लोक आमच्याकडे विश्वासाने येतात कारण आमच्याकडून काम होतील  हा आमच्यावरील असलेला त्यांचा विश्वास आहे. नियमात असलेली काम वेळेत होणे हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे. आम्हाला निष्पक्षपाती कामाची तुमच्याकडून अपेक्षा आहे. प्रत्येक अभ्यंगतांच काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आम्ही पाठवलेल्या अभ्यंगतांचा अपमान हा आमचा अपमान आहे. हा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. निष्पक्ष काम करा कुणाचेही शाखाप्रमुख म्हणून काम करू नका असा संताप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला आहे.


एकंदरीतच, नागरिकांचे प्रतिनिधी असणारे लोकप्रतिनिधी सभागृहात नसल्यानं व प्रशासकीय राजवट असल्यानं 'हम करेसो कायदा' असा कारभार सुरू आहे. जिथे लोकप्रतिनिधींनाच झगडावं लागतंय तिथे सर्वसामान्यांची काय अवस्था असेल हे वेगळ सांगायला नको. सद्यस्थितीत नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यात लोकसभा, विधानसभेचे वारे आतापासूनच वाहू लागलेत‌. त्यामुळे २०२२ ला बंद झालेलं सर्वसामान्यांच हे  दार लवकर उघडावं असा आर्जव सावंतवाडीकर करत आहेत.