सिंधुदुर्गात खासगी दवाखान्याच्या ओपीडी राहणार बंद

कोलकत्ता घटनेचा निषेध : डॉ राजेंद्र पाताडे
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 17, 2024 05:48 AM
views 308  views

वैभववाडी : कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या पाशवी अत्याचार व अमानुष खूनाचा आज देशभर डॉक्टर संघटनेंकडून निषेध होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पॅथी आज एक दिवस बंद ठेवून या घटनेचा निषेध करणार आहेत. अशी माहिती डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

  मानवतेला कलंकित करणार्‍या कलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज मधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या पाशवी अत्याचार व अमानुष खून  करण्यात आला. या घटनेचा डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग संघटनेकडून आम्ही तीव्र निषेध करतो. मन विषण्ण करणारी व देश हादरवून टाकणारी ही पाशवी आणि भ्याड कृती आहू. तसेच क्रूर मानसिकतेचे निर्देशक आहे. या घटनेतील दोषी नराधमांना कठोर शासन व्हावे यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने आज १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी वैद्यकीय सेवा स्थगित करून एक दिवसीय बंद पुकारला आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा सर्वपॅथी डॉक्टर संघटना DFC या एकदिवसीय बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण विभाग बंद राहील. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी आजचा एक दिवस वैद्यकीय सेवा स्थगीत ठेवून सहकार्य करावं असं आवाहन अध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे व सचिव  डॉ सुहास पावसकर यांनी केले आहे.