'आयुष रुग्णालया'ची ओपीडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू करावी !

युवा रक्तदाता संघटनेची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: September 25, 2025 16:19 PM
views 149  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांचे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र (OPD) सुरू करण्याची मागणी युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांनी केली आहे. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी यांनी निवेदन देत लक्ष वेधलं आहे. या मागणीमुळे सावंतवाडी शहर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी पेडणे, धारगळ (गोवा) येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानमध्ये जातात. तेथील उपचारांचा चांगला फायदा होत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, लांबच्या प्रवासामुळे अनेक रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. याची दखल घेत  युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष आणि रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सूर्याजी यांनी पाठपुरावा केला आहे. ते म्हणाले, अनेक रुग्णांनी यासाठी आमच्याकडे विनंती केली होती. सावंतवाडीतच आयुर्वेद सेवा उपलब्ध झाली, तर त्यांना मोठा फायदा होईल आणि प्रवासाचा त्रास वाचेल. या मागणीची दखल घेऊन आम्ही ही विनंती आम. दीपक केसरकर व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ही सेवा लवकरच सुरू झाल्यास भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. आयुष रुग्णालयाच्या या नवीन OPD सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेद उपचारांसाठी गोव्याला जाण्याची गरज भासणार नाही. ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. आरोग्य विभागाने या मागणीवर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

याबाबतच्या मागणीच पत्र त्यांनी श्री. केसरकर यांना दिलं असून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, मेहर पडते, अनिकेत पाटणकर, ॲड. प्रथमेश प्रभू, सुरज मठकर, वैभव सावंत, संदीप निवळे, देवेश पडते, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.