अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात : कवी अजय कांडर

कणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम
Edited by:
Published on: January 31, 2025 14:16 PM
views 200  views

कणकवली : आपली बोली टिकली तरच आपली प्रमाणभाषा टिकत असते. त्यामुळे बोलीला अडाण्यांची भाषा म्हणणारे लोकच अडाणी असतात. उलट ज्या अशिक्षित लोकांना आपण अडाणी म्हणतो तेच भाषा टिकवीत असतात. कारण त्यांच्या रोजच्या बोलण्याच्या बोलीतूनच प्रमाण भाषेला नवनवीन शब्द मिळत असतात. परिणामी उच्चशिक्षित वर्गापासून न शिकलेल्या वर्गापर्यंत सर्वांनीच आपल्या बोलीचा अभिमान बाळगून आपल्या बोलीत अधिकाधिक बोलत राहिले पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथील न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात बोलताना केले.

कणकवली न्यायालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त कवी अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाषा संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी 'मराठी अभिजात भाषा आणि आपण' या विषयावर कवी कांडर यांनी आपले विचार मांडले. यावेळी न्यायमूर्ती श्री शेख, न्यायमूर्ती श्री सोनटक्के, ज्येष्ठ वकील ॲड. विलास परब, ॲड.दळवी, ॲड.प्राजक्ता शिंदे, ॲड.चिंदरकर आदी उपस्थित होते. कवी कांडर म्हणाले, जगात कोणतीच भाषा कुणाची दुश्मन नसते. तरीही आपण आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगत त्या भाषेची जपणूक करत राहिले पाहिजे. मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला, यात बोली भाषेचेही महत्त्वाचे योगदान आहे.

रंगनाथ पठारे समितीने अभिजात भाषेचा अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला. यामध्ये हरी नरके या अभ्यासकांचे महत्त्वाचे परिश्रम आहेत. अर्थात अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून मिळाला म्हणून ती भाषा दीर्घकाळ टिकेल असं नाही तर आपण त्या भाषेचा रोजच्या जगण्यात किती वापर करतो यातूनच भाषा टिकत असते. अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषेला प्राप्त होतो त्या भाषेच्या विकासासाठी दरवर्षी केंद्र शासनाकडून काही कोटीचा निधी मिळतो. त्यातून मराठी भाषे संदर्भात उपक्रम राबवले जातील ही चांगलीच घटना आहे.तरीही भाषा टिकविण्याची प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून आपला रोजचा व्यवहारच आपल्या भाषेतून होत राहिला पाहिजे. मात्र दुसरीकडे सध्या जे साहित्यिक आपली भाषा टिकायला पाहिजे असं म्हणतात त्यातील काही साहित्यिक मात्र आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण देत नाहीत. आज मराठीतून शिक्षण घेणारी अनेक माणसे उच्च पदावर आहेत, परदेशात कर्तुत्व सिद्ध करत आहेत. त्यामुळे इंग्रजी मधून शिक्षण घेतले म्हणजेच पुढे जाता येते हा गैरसमज आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ झाले, जागतिक कीर्तीचे लेखक झाले, जागतिक कीर्तीचे संगणक तज्ञ झाले. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेऊनही मुले मोठ यश मिळवितात हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या मुलांना मराठीतूनच शिक्षण दिले पाहिजे.

यावेळी न्यायमूर्ती शेख यांनी आपल्या भाषेच आपण संवर्धन करायला पाहिजे आणि त्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असतात असे आग्रहाने सांगितले. तर ॲड. दळवी यांनी मराठीत लिहिताना व्याकरणाकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे असे आवाहन केले. ॲड. विलास परब यांनी सूत्रसंचालन केले.ॲड. प्राजक्ता शिंदे यांनी आभार मानले.