
मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप व शिंदे शिवसेना पक्षाकडून एलईडी पर्ससीन सारखी अतिरेकी मासेमारी करणाऱ्यांना उमेदवारी दिली गेली असून एलईडी पर्ससीन वालेच या दोन्ही पक्षांना नगरपालिका निवडणुकीसाठी आर्थिक मदत करत आहेत असा आरोप करत अशा उमेदवारांना मच्छिमारांनी घरी बसवावे, असे मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मालवण दांडी येथे पारंपारिक मच्छिमारांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बाबी जोगी, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, नारायण रोगे, सुधीर चिंदरकर, हेमंत मोंडकर, अक्षय रेवंडकर, भार्गव खराडे, बाळा मिटकर, किस्तु फर्नांडिस आदी उपास्थित होते.
यावेळी सरकारने केलेल्या नवीन बंदर करारानुसार किनारपट्टीवर प्रत्येक चार किलोमीटर अंतरावर बंदर उभारण्याचत येणार आहेत. ही बंदरे कोणासाठी उभारली जाणार आहेत. ही बंदरे बांधण्यासाठी किनारपट्टीवरील गावे उध्वस्त केली जाणार आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणावर मच्छिमारी वस्ती असून ती देखील उध्वस्त होणार आहे. राज्यातील भाजप व शिंदे सरकार हे मच्छिमार विरोधी सरकार आहे. नगरपालिका निवडणूक ही एक संधी असून ही संधी साधत मच्छिमारी उध्वस्त करणाऱ्यांना निवडणुकीच्या निमित्ताने घरी बसविण्याची संधी मच्छिमारांकडे आहे, असेही बाबी जोगी म्हणाले.
यावेळी रश्मीन रोगे म्हणाले, आज पारंपारिक मच्छिमारांवर ईईझेड म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्राचे संकट घोंघावत आहे. यामध्ये मदर बोट सारखी सुविधा दिली आहे. आपले मच्छिमार २४ फूट लांबीची बोट मच्छिमार घेऊ शकत नाहीत. मदर बोटीचा विचारही करू शकत नाहीत, अशा बोटीना बाहेरच्या कंपन्या जोडल्या जाणार असून बाहेरच्या बाहेर माशांचा सप्लाय केला जाणार आहे, यामुळे स्थानिक मच्छिमारांची रोजीरोटी हिरावून घेतली जाणार आहे. आज सरकार अनुदान व मत्स्य शेती प्रकल्प देत असली तरी ते समुद्राबाहेरील जागेवर होणाऱ्या प्रकल्पासाठी आहे. एकही प्रकल्प समुद्रातील नाही. समुद्रातील मासेमारी बंद करून त्यासाठी जमिनीवरील प्रकल्प हे पर्याय म्हणून देण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे प्रत्येक मच्छिमाराने वेळीच जागे झाले पाहिजे, असेही रश्मीन रोगे म्हणाले.










