मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी | विद्यार्थ्याना एकाच वेळी घेता येणार दुहेरी पदवीचे शिक्षण
Edited by: भगवान शेलटे
Published on: July 29, 2025 13:16 PM
views 166  views

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (सीडीओई) (पूर्वीचे आयडॉल ) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शिक्षण शुल्क, युजीसी (डीईबी) आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईची बलस्थाने आहेत. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे.

बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम ( कॉमर्स, अकाऊटंसी, आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत.

एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क);  एम. कॉम.  (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविले जात आहेत.  

पहिल्यांदाच एम. ए. समाजशास्त्र ऑनलाईन

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पहिल्यांदाच या शैक्षणिक वर्षापासून एम. ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु केला जात आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. पात्रता धारक कोणत्याही विद्यार्थ्यांना कुठूनही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.   

सीडीओई मार्फत चालविण्यात येणाऱ्या एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश एन्ट्रन्स परीक्षेद्वारे केले जात असून लवकरच या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षेसाठी https://forms.epravesh.com/MumbaiUniversity/ या संकेत स्थळावर दिनांक ३१ जुलै पर्यंत नोंदणी करता येणार असून ३ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाइन प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 

पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/  या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील आणि माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्ट्स) विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक शिक्षण पद्धतीतून पूर्ण करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांची दालने खुली करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश्य आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा किमान पात्रता धारक विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून दिली जात आहे. सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. नजीकच्या काळात पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरु होणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. सीडीओईच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती, दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि एलएससी केंद्रांच्या स्थापनेसाठीची कार्यपद्धती व करार यासाठी सीडीओईच्या माध्यमातून आज एसपीके महाविद्यालय सावंतवाडी आणि कणकवली महाविद्यालय कणकवली येथे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्याशी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीडीओईच्या वतीने संचालक प्रा. शिवाजी सरगर, प्रा. अनिल बनकर आणि प्रा. मंदार भानुशे उपस्थित होते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीडीओईची नवीन विद्यार्थी सहायता केंद्र ( एलएससी )

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहायता केंद्राच्या स्थापनेसाठी करार

दुहेरी पदवीसाठी विद्यार्थी सहायता केंद्रांकडून प्रोत्साहन

महाविद्यालयात नव्याने स्थापन होत असलेल्या या विद्यार्थी सहायता केंद्राच्या ( एलएससी) मदतीने विद्यार्थ्याना सीडीओईच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुलभता, समुपदेशन, परिचय सत्रे, गृहपाठ, प्रात्यक्षिके आणि प्रकल्प कार्य हाताळणे, सत्र/सत्रांती परीक्षा घेणे, ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये सहाय्य प्रदान करणे यासह शैक्षणिक कागदपत्रे हाताळणे आणि विद्यार्थांना गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातील. विशेष म्हणजे सीडीओईच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या दुहेरी पदवीसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 

करार करण्यात आलेल्या महाविद्यालयांची नावे

1. पुंडलिक अंबाजी कारले महाविद्यालय,  शिरगाव 

2. डॉ. बाबासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला 

3. श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी 

4. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ 

5. लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग 

6. एसकेपीएस वाणिज्य आणि डीएसजी विज्ञान महाविद्यालय, मालवण

7. ⁠आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग 

8. कणकवली महाविद्यालय कणकवली 

9. कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट

अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसराला भेट देता येईल किवा संपर्क साधता येतील. 

पत्ता आणि संपर्क क्रमांक: 

मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर

मा. बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी, 

जिमखाना मैदान जवळ, 

सावंतवाडी, 

जिल्हा. सिंधुदुर्ग, 

संपर्क : 9619486265 इथं संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.