धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी

अॅड. प्राजक्ता शिंदे यांचा यशस्वी युक्तिवाद
Edited by:
Published on: January 17, 2025 18:45 PM
views 86  views

कणकवली : हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.सोनटक्के यांनी विश्वास मनोहर सावंत (नरडवे, -कणकवली ) याना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी फिर्यादीतर्फे अँड. प्राजक्ता म.शिंदे यांनी काम पाहिले.

या बाबत हकीकत अशी की, फिर्यादी विजय तुकाराम राणे, (हळवल, -कणकवली)  यांच्याकडून विश्वास मनोहर सावंत यांनी कौटुंबिक आर्थिक अडचणीपोटी ५,००,०००/-(रुपये पाच लाख)  रुपये रक्कम हातउसनवार घेतली होती. आरोपीशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध पाहून फिर्यादी याने सदर क्कम आरोपी यास उसनवार दिली होती. त्यानंतर आरोपी याने रक्कम परत करणे आवश्यक असताना त्याने ते परत केले नाहीत. फिर्यादी यांनी जास्तच तगादा लावल्यावर आरोपीने फिर्यादी यास रु. ५,००,०००/- (रुपये पाच लाख) रकमेचा बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कणकवलीचा धनादेश दिला. सदरचा धनादेश फिर्यादी यांनी आपल्या बँकेत भरला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नाही. त्यानंतर फिर्यादीने आरोपीला वकिलामार्फत नोटीस पाठवली. नोटीसीचा कालावधी संपल्यानंतरही आरोपीने पैसे परत न केल्याने फिर्यादीने आरोपीवर निगोशीएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केला होती.

या प्रकरणी कणकवली न्यायालयात केस चालली. फिर्यादीचे अँड. प्राजक्ता म.शिंदे यांनी दिलेले पुरावे व केलेला युक्तीवाद विचारात घेऊन आरोपी विश्वास मनोहर सावंत  यास दोषी ठरवून न्यायालयाने आरोपीस १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच धनादेशातील रक्कम रू.५,००,०००/- दोन महिन्याच्या आत फिर्यादिस देण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादीच्या वतीने अँड. प्राजक्ता म.शिंदे यांनी काम पाहिले.