
वैभववाडी : प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर करुळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जवळपास एक टन प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे. गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिक मध्ये प्लास्टिक बॉटल व पिशव्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत करूळ व माध्यमिक विद्यालय करूळ यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. तसेच प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या या उपक्रमाचे वैभववाडी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी कौतुक केले.
घराशेजारी अस्ताव्यस्त पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल, पिशव्या तसेच रस्ता व सार्वजनिक ठिकाणच्या बॉटल गोळा करण्यात आल्या. सदर अभियान हे दर महिन्याला राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्लॅस्टिकची बंदी असताना कोणीही प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे यावेळी ग्रामपंचायत वतीने सांगण्यात आले आहे. प्लास्टिक गोळा मोहिमेत संपर्क अधिकारी संतोष टक्के, सरपंच नरेंद्र कोलते, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, उदय सावंत, मुख्याध्यापक दिपक घाटगे, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, विलास गुरव, श्री. कानडे, दत्ता पाटील, वैभव पाटील, अर्चना पाटील व विद्यार्थी, ग्रामस्थांचा समावेश होता.










