
मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री आंबेरी सडा येथे एका जागेत खाडी पात्रातून उत्खनन करून ठेवलेला सुमारे एक हजार ब्रास वाळू साठा महसूल पथकाने सील केला आहे.
अनधिकृत वाळू साठा प्रकरणी जमीन मालकास नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच हा वाळू साठा कोणी केला याची तसेच अन्य चौकशी करून पुढील कारवाई करत या वाळू साठ्याची लिलाव प्रक्रियाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी गुरुवारी सकाळी दिली.