
कुडाळ : कुडाळ येथील जिजामाता चौकात एकावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. या हल्यात एक ६० वर्षीय गृहस्थ गंभीर जखमी झाला आहे. मोहम्मद अली सुलतान बागवान (कुडाळ, नाबरवाडी)असे जखमीचे नाव आहे. इरफान काजरेकर (कुडाळ, रेल्वेस्टेशन) याने हा हल्ला केला असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हा हल्ला होताच मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी १०८ नंबरवर कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलावली. यानंतर त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुडाळ येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक तपासासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा आणि हल्ला झालेला हा दोघेही व्यक्ती भाजीविक्रते आहेत. आज बुधवारी आठवडा बाजारानिमित्त नेहमीप्रमाणे भाजी विक्री करत असताना या दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी इरफान याने त्याच्या हातातील भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने बागवान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले आहे.