
दोडामार्ग : माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येक माणसाचे आयुष्य हे फार सुंदर आहे. त्यामुळे आयुष्यातले रंग समजण्यासाठी आपले डोके शाबूत ठेवायला पाहजे. त्यासाठी आपण कोणतीही नशा करू नये तरच आयुष्यातले खरे रंग कळू शकतात. तसेच आपली मुले ही कोणी श्रावणबाळ नाही तर कोणी पालकही श्री रामांचे अवतार असू शकत नाही त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी ओळखावी. शिवाय कोणीही सरकार दारू बंदी, सिगारेट बंदी, आदींसाठी कोणतेच व्यसन बंद करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी आहे असे समजून व्यसन करूच नये असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी केले.
पंचायत समिती दोडामार्गच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नशा मुक्त दोडामार्ग जनजागृती पदयात्रा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान जि. प. शाळा क्रमांक १ च्या मैदानातून पदयात्रेला सुरुवात केली जवळपास ६ किमी अंतर पायी चालत शरदक्षेत्र सभागृह येथे येऊन संपविली. त्यानंतर सभागृहाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. देवधर बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, झरेबांबर सरपंच तथा सरपंच सेवासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, आयनोडे सरगवे पुनर्वसनच्या सरपंचा श्रुती देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त कनिष्ठ प्रशासन अधिकारी जगदीश सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले. यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर विद्यार्थिनी स्पृहा सुमित दळवी, दक्षता बाबुराव घोगळे यांनी व्यसनमुक्ती संदर्भात भाषण केले. तर करण शेटकर यांची सेवन नावाची व्यसनमुक्तीपर मार्गदर्शनासाठी चित्रफित दाखविण्यात आली.
व्यसनापासून दूर रहाणे हेच सोयीस्कर....
डॉ. देवधर पुढे म्हणाले की, काही वेळा काही व्यक्ती हे फक्त रविवारी दारू पितात असे सांगतात पण काही कालावधीनंतर त्या पिणाऱ्या व्यक्तीला रोजच रविवार वाटायला लागतो. आणि त्यामुळे तो रोजच मग पितो आणि व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडतो त्यापेक्षा त्या व्यसनापासून दूर राहणेच सर्वस्वी सोयीस्कर ठरते. काहीवेळा आपला मुलगा जर दारू पित असेल तर त्याचे लग्न करून दिले तर ते दारू सोडेल पण असे कधीही नसत त्यामुळे दारू पिणाऱ्याचे तर आयुष्य धोक्यात असतेच शिवाय त्याच्यामुळे दुसऱ्याच्या मुलीचेही आयुष्य धोक्यात येते त्यामुळे लग्न करून देणे हा उपाय नाही आहे असेही देवधर यांनी स्पष्ट केले.











