छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती उत्साहात
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 14, 2026 14:23 PM
views 27  views

सिंधुदुर्गनगरी :  हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धे आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांनी संभाजी महाराजांचा संघर्षमय जीवनपट उलगडून सांगत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर विद्वान, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांनी आपल्या पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाच्या बळावर साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. संकटांसमोर कधीही न झुकणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तृप्‍ती  धोडमिसे यांनी केले. तसेच आपण संभाजी महाराजांचे धैर्य, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान यांचे आचरण आपल्या जीवनात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते, असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमास निवासी उपजिल्‍हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन केले.