
चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘एक राखी देशासाठी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन सोमवार, २८ जुलै रोजी करण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. या माध्यमातून “माझा देश, मी देशाचा” ही संकल्पना विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागवण्याचा प्रयत्न होणार आहे.
उपक्रमाची सुरुवात सोमवारी सकाळी १०.३० वाजता शाळेच्या प्रवेशद्वारावर सरस्वती पूजन व मातृभूमी प्रतिमेच्या पूजनाने होईल. यानंतर आठवी व नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांची रक्षासूत्र फेरी निघेल. फेरीस युनायटेड इंग्लिश स्कूल आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यम शाळेचे विद्यार्थी सहभागी होतील. इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून त्यांना रक्षासूत्र बांधून निरोप दिला जाईल.
ही विद्यार्थी फेरी सकाळी ११.३० वाजता चिपळूण पोस्ट कार्यालयात पोहोचेल. याठिकाणी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांची पाकिटे अधिकृतपणे पोस्ट विभागाच्या प्रतिनिधीकडे सुपूर्त करण्यात येतील. यावेळी सर्व विद्यार्थी एकत्र येऊन भारताची प्रतिज्ञा व महाराष्ट्र गीत सादर करतील.
यानंतर ही फेरी चिपळूण-कराड रस्त्याने परत शाळेत दाखल होईल. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येईल आणि सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता होईल. याच दिवशी संकुलातील सुमारे ४,००० विद्यार्थ्यांचे एकत्रित रक्षाबंधन सोहळाही पार पडणार आहे.
या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना शाळेच्या वतीने सांगण्यात आले की, “भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हे रक्षासूत्र पाठवले जाईल. या माध्यमातून विद्यार्थी आणि सैनिक यांच्यातील बंध अधिक दृढ होतील. ‘माझ्या मित्राचे वडील सीमारेषेवर आपले रक्षण करत आहेत’, ही जाणिव विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची जाणीव अधिक ठामपणे निर्माण करेल.”