
कुडाळ : बाव बांबुळी रस्त्यावरील जामदारवाडी तिठा येथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात, मद्यधुंद टेम्पो चालकाने धडक दिल्याने कविलकट्टा येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लालसाब दौलसाब खानापूर (वय ४९, रा. कविलकट्टा, जामदारवाडी) असे मयत यांचे नाव आहे. टाटा जेनान टेम्पो (क्रमांक MH 10 AW 9944) पांडुरंग शिवाजी खोत (वय ४०, रा. बेळगाव, कर्नाटक) हे वाहन चालवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अंदाजे ०९:४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टाटा जेनान टेम्पोचा चालक पांडुरंग शिवाजी खोत हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्याने बाव रोडवरील जामदारवाडी तिठा येथे लालसाब दौलसाब खानापूर यांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, लालसाब खानापूर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने दारू पिऊन गाडी चालवल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे हे करत आहेत.










