
पनवेल : शेकाप-महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांनी आज मकरसंक्रांतीचे औचित्य साधून पनवेल मतदार संघासह रायगड जिल्ह्याच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात हा मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. मी पुन्हा पहिल्या पसंतीच्या मतावर मोठ्या मताधिक्याने पहिल्याचं फेरीत विजयी होणार. या माझ्या विजयात सर्व पक्षाचे कार्यकर्ते, शिक्षक संघटना, शिक्षक यांचा मोलाचा वाटा असेल, असा दावा बाळाराम पाटील यांनी केला आहे.
यावेळी मेळाव्यात व्यासपीठावर विद्यमान आमदार तथा कोकण शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल मतदार संघ विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, जे.एम.म्हात्रे, नारायण शेठ, पनवेल म.न.पा. जिल्हा चिटणीस गणेश कडू, डाॅ.दत्तात्रय पाटील, माजी नगरसेविका प्रिती जाॅर्ज, नरेशशेठ घरत उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळाराम पाटील म्हणाले भाजप मधील अंतर्गत कुरघोडीचा फायदा मला निश्चितच होईल. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उमेदवारीने या दोघांतील मतविभाजन अटळ आहे. तर यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिक्षक सेना आणि टीडीएफ संघटना माझ्या सोबत असून त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची शिक्षक सेना व कार्यकर्ते पेटून उठून जोमाने काम करत आहे. याचा फायदा आपल्याला निश्चितच या निवडणुकीत होणार आहे. मला अनेक शिक्षक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. तर अनेक शाळांनी पाठींबा दिला आहे.या निवडणुकीत सध्या आपल्या बाजूने चांगले पोषक वातावरण आहे.या ठिकाणची गर्दी बघून मला खात्री आहे की माझा विजय आजच निश्चित झाला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही आपल्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाठिंबा दिलेल्या सर्वच संघटना जोमाने काम करत आहेत. टीडीएफ,शिक्षकेत्तर संघटना,शिक्षक सेना यासह अनेक संघटना जोमाने काम करत आहे. सिंधुदुर्गात आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने काम करत आहे.तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात खासदार विनायक राऊत हे मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहे.तळकोकणातील हा पाठींबा निश्चितच आनंद देणारा आहे.
माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत जी काही आंदोलने केली,मोर्चे काढले,लोकांसाठी लढलो,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गासाठी लढलो,विधानपरिषदेत अनेक प्रश्न उपस्थित करून ते सोडवले.यामुळे आपला विजय निश्चित आहे.असे सांगत कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागावे असे आवाहन शेकाप कार्यकर्त्यांना बाळाराम पाटील यांनी केले.