
सावंतवाडी : मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी आध्यशिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, लेखिका, समाजसुधारिका,चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये बांधल्या गेलेल्या स्त्रीच्या हातामध्ये पाटी, पेन व पुस्तक देऊन तिला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या एकविसाव्या शतकातल्या थोर महानायिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक भारती सिंधुदुर्ग, शाखा- सावंतवाडीतर्फे , सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक, राजलक्ष्मी राणे या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा नारी शक्तीचा सन्मान म्हणून शिक्षक भारती सिंधुदुर्ग व सावंतवाडी शाखेतर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तब्बल चाळीस वर्षे पोलीस खात्यात सेवा बजावून नुकत्याच सेवा निवृत्त झालेल्या राजलक्ष्मी राणे ह्यांनी सेवा काळात केलेली सेवा, ही निश्चितच सर्व समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे.
आज संपूर्ण सावंतवाडीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये राणे मॅडमबद्दल आदराचे स्थान आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा वसा पुढे नेणाऱ्या या सावित्रीच्या लेकीचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला. ह्यावेळी शिक्षिका अनिता सडवेलकर, सुश्मिता चव्हाण, शिक्षक अनंत सावंत, संतोष वैज, अरविंद मेस्त्री, राजाराम पवार, प्रदीप सावंत हे शिक्षक भारती सावंतवाडीचे शिलेदार उपस्थित होते.
"पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यावर आपली दखल कोणी घेईल, ही अपेक्षा कधीही बाळगली नाही. मात्र आज शिक्षक भारतीच्या शिक्षक - शिक्षिका बांधवांनी माझ्या घरी येऊन केलेल्या सत्कारबद्दल मी केलेली सेवा निश्चितच फलदायी ठरली, असे वाटते. सावित्रीबाईंच्या लेकी म्हणून वावरणाऱ्या समाजात आजही अनेक उपेक्षित बालिका आहेत, त्या वंचितांना न्याय मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील राहील!"
- राजलक्ष्मी राणे,
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक