
दोडामार्ग : गोवा राज्यातील फोंडये परिसरातून कळणे मायनिंग मार्गे कळणे गावात बुधवारी सायंकाळी दाखल झालेल्या जंगली ‘ओंकार’ हत्तीने रात्री उशिरा मोठा कहर केला. शेतकरी शाहिर इस्माईल खान यांच्या शेतात बांधून ठेवलेल्या पाळीव जनावरांकडे हत्तीने वाटचाल केली आणि अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात वनखात्याच्या कर्मचार्यांनी दोन जनावरांचे दोर (दावी) तोडल्याने ते वाचले असले तरी तेथे बांधलेल्या तिसऱ्या बैलाचा ओंकार च्या हल्ल्यात बळी गेला आहे. यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावला असून संताप व्यक्त होतं आहे.
हत्ती आक्रमक झाला असल्याचे लक्षात येताच वनखात्याच्या कर्मचार्यांनी दोन जनावरांचे दोर (दावी) सोडवले. मात्र हातात कोयता नसल्याने तिसऱ्या बैलाचे दावे कापता आले नाहीत. दरम्यान, संतप्त ओंकार हत्तीने या बैलावर जोरदार हल्ला चढवला. त्याचे बरगडे आणि पाय मोडून गंभीर जखमी केले. यात तडफडुन त्या बैलाचा मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर हत्तीने परिसरातील केळी बागायतीचेही मोठे नुकसान केले. याबाबतची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. सावंतवाडी तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका म्हशीचा बळी गेल्यानंतर ओंकार हत्तीच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू होणारी ही दुसरी घटना आहे. त्यामुळे कळणे आणि आसपासच्या भागात शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती पुढे भिकेकोनाळ दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते.
सरपंच अजित देसाई यांची तीव्र प्रतिक्रिया
कळणे सरपंच अजित देसाई यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत म्हटले, “नुकसानी टाळण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण तरीही वाईटच झालं. निदान शेतकऱ्याला त्वरित भरपाई तरी मिळावी आणि हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.” “वनखाते आणि स्थानिक ग्रामस्थ सोडले तर अशा प्रसंगी एकही प्राणीमित्र मदतीसाठी पुढे येत नाही. फक्त सोशल मीडियावर भूमिका मांडून काही होत नाही; जमिनीवर उतरून काम केलं तर शेतकरी काय भोगतो हे कळेल.”
शेतकरी संघटना प्रतिनिधी विलास सावंत यांची टीका
शेतकरी संघटना प्रतिनिधी विलास सावंत यांनी देखील कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ओंकारच्या बचावासाठी उपोषण, आंदोलन करणारे आता कुठे आहेत? निदान या शेतकऱ्यांना भेटून सांत्वन करणे किंवा नुकसानभरपाईबाबत पाठपुरावा करणे त्यांना गरजेचे वाटले नाही.” “कुचकामी आणि बेगडी प्राणीप्रेमामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान भरून येत नाही. शेतकऱ्यांच्या जीवित आणि संपत्तीच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेच पाहिजे.”
एकूणच आता दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी वर्गात वन्य हत्तीकडून होणाऱ्या शेती बागायतीचं अतोनात नुकसान आणि आता माणसे व त्यानंतर हत्ती पाळीव जनावरांचे बळी घेऊ लागल्याने शेतकरी वर्ग कमालीचा आक्रमक बनतो आहे.










