
सावंतवाडी : येथील रघुनाथ मार्केटच्यामागे असलेल्या जुन्या मटन मार्केटची इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती कधीही कोसळू शकते अशी भीती स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या इमारतीच्या परिसरातून नागरिकांची सतत ये-जा सुरू असल्याने पावसाळ्यात ही इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
या इमारतीवर एक मोठे झाड वाढले असून ते स्वच्छतागृहाकडे जाण्याच्या मार्गावरच आहे. यामुळे इमारतीची स्थिती आणखीच कमकुवत झाली आहे. स्वच्छतागृहाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. स्थानिक नागरिक हरेश नारूरकर यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, ही मोडकळीस आलेली इमारत लवकरात लवकर जमीनदोस्त करून नगरपालिका प्रशासनाने ही जागा मोकळी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. भविष्यात ही इमारत पडून जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील.
या धोकादायक इमारतीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून नगरपालिकेने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.