तीन तासांची पायपीट | दोन मतांसाठी अधिकारी पोहचले धनगरवाड्यात

Edited by:
Published on: November 18, 2024 13:12 PM
views 66  views

चिपळूण : डोंगर दऱ्यातील धनगरवाड्यातून आजही ये-जा करण्यासाठी रस्ते, पिण्यासाठी पाणी आणि विजेची सुविधा पोहोचलेली नाही. विकास याच विषयापासून कायम अलिप्त राहिलेले धनगरवाड्यात मात्र मतदानाविषयी जागरूकता दिसून येते. हे पाहून मतदान कार्यक्रमात सहभागी झालेले अधिकारी देखिल चक्रावून गेले. तालुक्यातील कोळकेवाडी जांबराई धनगरवाडीत होम वोटींगमध्ये सहभागी होम वोटींगचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डोंगर दऱ्यातून जाताना व येताना तीन   तासांची पायपीट केल्यानंतर तेथील दोघा ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला. उंच कड्यावर वास्तव्यास असतानाही राहत्या घरी मतदानाचा अधिकार निभावताना त्यांचा चेहरा मात्र निरपेक्ष भावनेने फुलला होता.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बाधवांना राहात्या घरी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शासकीय यंत्रणा सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. वाडी वस्तीवर भेटीगाठी देऊन अशा मतदारांचा शोध घेत ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. गुरुवारपासून होम वोटींगची प्रक्रिया सुरू झाली असून शुक्रवारी तालुक्यातील ग्रामीण भागात हा कार्यक्रम राबवण्यात आला. या मतदानासाठी पथकांची निर्मिती केली असून यातील काही पथके सह्याद्री खोऱ्यात असलेल्या वस्तीमध्ये पोहोचत आहेत. यातील काही मतदार उंच डोंगर माथ्यावर धनगवाड्यात वास्तव्यास आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून अगदी प्रचार सभापर्यंत अलिप्त असलेला हा समाजबांधव अजूनही उमेदवारांच्या प्रतीक्षेत नजरा लावून आहे. उमेदवार धनगरवाड्यांवर येऊन आमचे प्रश्न समजून घेतील, या भावनेतून हे बांधव वाट पाहात आहेत, अशातच शासकीय यंत्रणा या समाजबांधवाच्या घरी पोहोचतात. तेव्हा त्यांच्यातील मतदानाविषयी असलेली जागरूकता पाहून अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले.

तालुक्यातील कोळकेवाडी जांबराई धनगरवाडीत होम वोटींगसाठीचे एक पथक शुक्रवारी दाखल झाले होते. ६ जणांचा समावेश असलेले हे पथक सकाळी ८ च्या सुमारास मोहिमेवर रवाना झाले. मुख्य रस्त्यापासून डोंगर माथ्यावर असलेल्या या धनगर वाडीत जाताना झाडी, झुडपे व जंगल मार्गाने प्रवास करताना तब्बल दीड तासाची पायपीट करावी लागली. या पथकाचे निरीक्षक श्री. खत्री, समवेत केंद्रस्तरीय अधिकारी मंगेश पिंगळे, मतदान अधिकारी सपना जाधव, केंद्र अध्यक्ष गणेश लोखंडे, पोलिस चाटे, छायाचित्रकार यश कासार, ग्रामपंचायत कर्मचारी संदेश मोहिते आदी धनगरवाडीत पोहोचले. तेथील दोघा ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून सांगत त्यांचे मतदान करून घेतले. घरीच मतदान करता आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा दीड तासाची पायपीट करीत दुपारी साडेबाराच्या सुमारास हे पथक मुख्य रस्त्यावर पोहोचले.