पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या अधिकाऱ्यांची नगरपरिषदेच्‍या प्रकल्पांना भेट

Edited by:
Published on: April 13, 2024 13:11 PM
views 95  views

वेंगुर्ले :  राष्‍ट्रीय स्‍तरावर अव्‍वल नामांकन प्राप्‍त वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या  ‘स्वच्‍छ भारत पर्यटन स्‍थळ’ (कंपोष्‍ट डेपो) येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विकसित करण्यात आलेल्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या विविध प्रक्रिया केंद्रांची पाहणी करण्‍यासाठी व वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत बनविण्‍यात आलेल्‍या नाविन्‍यपूर्ण कलाकृती पाहण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासन, पर्यावरण व वातावरण बदल विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे, संचालक अभिजीत घोरपडे व जॉय ठाकूर यांनी शुक्रवारी १२ एप्रिल रोजी नगरपरिषदेच्या या विविध प्रकल्पात भेट दिली. 

सुरुवातीला मान्‍यवरांना नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह या ठिकाणी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत बनविण्‍यात आलेल्‍या स्वच्‍छता या संकल्‍पनेवर आधारित विविध व्हिडीओ, प्रेजेटेंशनद्वारे शहरातील घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्‍यात आलेले वि‍विध उपक्रम व शहरातील नाविन्‍यपूर्ण विकास कामांची माहिती देण्‍यात आली. त्यानंतर मान्‍यवरांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प, मिरॅकल पार्क, सांडपाणी व मैलापाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प यांची पाहणी केली.  वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत पर्यटन स्‍थळ (कंपोस्‍ट डेपो) येथील वेस्ट टू बेस्ट  संकल्‍पनेनूसार विकसित करण्यात आलेल्‍या मिरॅकल पार्क व यमादोरी गार्डन या ठिकाणांना भेट दिली. कच-यातील टाकावू वस्‍तुंचा वापर करुन नाविन्‍यनपूर्ण कलाकृती बनवून वेंगुर्ला नगरपरिषद आपले वेगळेपण जपत असल्‍याचे गौरवोद्गार मान्‍यवरांनी काढले व वेंगुर्ला  नगरपरिषदेचे काम खरोखरच कौतुकास्‍पद असल्‍याचे सांगितले. सदर पाहणी दौ-यामध्‍ये प्रभारी जिल्‍हा प्रशासन अधिकारी अरविंद  नातू, सावंतवाडीचे मुख्‍याधिकारी सागर साळुंखे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, बॅरिस्टर.खर्डेकर महाविद्यालय च्या प्राध्यापिका धनश्री पाटील, प्रभारी स्‍वच्‍छता नि‍रिक्षक वैभव म्हाकवेकर, घनकचरा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक शजयेंद्र चौधरी, मुकादम संतोष जाधव आणि नगरपरिषदेचे  कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम जसे फुलपाखरू महोत्सव, स्विफ्टलेट पक्षी संरक्षण, सुरंगी वरील संशोधन, वृक्षारोपण मोहीम, सौरऊर्जा प्रकल्‍प, कांदळवन व्‍यवस्‍थापन इत्यादींची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पानथळ जागांचे संवर्धन बाबत नगरपरिषदेने बनविलेला अहवाल सादर करण्यात आला. 

वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या  स्वच्‍छ भारत पर्यटन स्‍थळ येथे अनेक महनीय व्‍यक्‍तींनी भेटी दिलेल्‍या आहेत. वेंगुर्लावासियांकडून व नगरपरिषदेच्‍या सफाई कर्मचा-यांकडून स्वच्‍छतेप्रती देण्‍यात येणा-या अमूल्‍य योगदानामुळे वेंगुर्ला शहराला नावलौकीक प्राप्‍त झालेला असून शहरामध्‍ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वेंगुर्ला नगरपरिषदेचा स्‍तर अधिक उंचावण्‍यात येणार असल्‍याचे मत मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.