कुडाळ आमसभेत अधिकाऱ्यांची दांडी

अनुपस्थित अधिकाऱ्यांचा आमदार निलेश राणेंकडून खरपूस समाचार !
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 27, 2026 21:06 PM
views 15  views

कुडाळ : कुडाळमध्ये तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण आमसभेत आज प्रशासकीय गलथानपणा उघडकीस आला. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सभेला उपस्थित राहणे अनिवार्य असतानाही, अनेक जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने आमदार निलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तालुक्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या या आमसभेला अनेक वरिष्ठ अधिकारी सुरुवातीला गैरहजर होते. यामध्ये प्रामुख्याने पीडब्ल्यूडी (PWD) अधिकारी पिसाळ, दूरसंचार अधिकारी जानू, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी वृषाली पाटील अधिकारी गैरहजर तर कुडाळ सीईओ औंधकर हे सभेला सायंकाळी ४:२० नंतर हजर झाले.

आमसभेला सात वर्षांनंतर बोलावण्यात आले होते, अशा वेळी प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित न राहणे म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला खीळ घालण्यासारखेच आहे, असा खणखणीत सवाल आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला. विशेषतः सी.ई.ओ. औंधकर हे सभेला ४:२० नंतर उशिरा पोहोचल्याने, सभेच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या वेळेत होणाऱ्या चर्चेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणावर सडकून टीका केली.

आमदारांनी थेट प्रशासनाला या अनुपस्थित आणि उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासन या अधिकाऱ्यांवर नेमकी काय भूमिका घेते आणि भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई टाळण्यासाठी काय उपाययोजना करते, याकडे संपूर्ण कुडाळ तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.