
दोडामार्ग : साटेली भेडशी ग्रामपंचायत क्षेत्रातील भेडशी खालचा बाजार येथील पाणंद रस्त्याची अधिकृत मोजणी करून ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच पाणंद रस्त्याची मोजणी करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली याबद्दल तेथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले तसेच सरपंच, उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभारही मानले.
साटेली भेडशी ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झालेली असून काही कामे प्रगतीपथावर तर पुढील कालावधीत आवश्यक रस्त्यांची कामे करण्यासाठी पाठपुरावा, प्रयत्न करण्यात येणार आहेत. यातीलच भेडशी खालचा बाजार (प्रभाग क्रं-१) येथील ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेल्या पाणंद रस्त्याची अधिकृत मोजणी प्रक्रिया ग्रामपंचायत स्थापनेपासून झाली नव्हती. आज रोजी या क्षेत्राच्या आजूबाजूला अनेक घरे उभी राहिली आहेत. या घराकडे जाण्यासाठी चांगल्या प्रकारचे पायवाट, पाणंद रस्ते निर्माण झाले पाहिजेत यातून येथील नागरिकांना सोयी सुविधा प्राप्त होईल, या उद्देशाने ग्रामपंचायतकडून सरपंच तसेच प्रभाग एक मधील सदस्य यांनी पाठपुरावा करून भूमी अभिलेख कार्यालयाकडून भेडशी पाणंद रस्ता सर्व्हे नं 78/45 येथील अधिकृत मोजणी प्रक्रिया बुधवारी पार पडली. या मोजणीवेळी पाणंद लगत खातेदार, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भूमिअभिलेख अधिकारी कर्मचारी यांच्याकडून मोजणी करण्यात आली. या मोजणीसाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत, सहकार्य करीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार उदभवू न देता शांततेत मोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी अधिकारी यांनी दाखविल्याप्रमाणे हद्द निश्चित करण्यात आली. पुढील काळात आवश्यक निधीची उपलब्धता करून पाणंद रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करून काँक्रीटीकरण करण्यात येईल व नागरिकांना सुलभता निर्माण करण्यात येतील.
यावेळी सरपंच छाया धर्णे, उपसरपंच सुमन डिंगणेकर, ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे, भूमिअभिलेख मोजणी कर्मचारी श्री. वळवी ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, शोभना जुवेकर, कर्मचारी विनोद परमेकर, रमेश करमळकर, निलेश कदम, ग्रामस्थ नंदकिशोर टोपले, जय भोसले, राजाराम टोपले, तुकाराम टोपले, मदन जुवेकर, प्रशांत मुंज, मधुकर जुवेकर, निखिल जुवेकर, आत्माराम टोपले, दत्तप्रसाद बोन्द्रे, संतोष पांगम, उदय गोलम, नागेश टोपले, देवानंद टोपले, आबा डांगी, नाना जुवेकर, प्रदीप डांगी, क्षितिज मणेरकर, बबन सोलापूरकर, यशवंत कुबडे, आनंद टोपले, मिथुन करमळकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पाणंद रस्त्यालगतचे खातेदार उपस्थित होते.
ऐतिहासिक कामगिरी- ग्रामपंचायत स्थापनेनंतर गाव नकाशात असलेल्या पाणंद रस्त्याची अधिकृत मोजणी आजपर्यंत झाली नव्हती त्यामुळे या ठिकाणी सोई सुधारणा करणे शक्य नव्हते. सरपंच, ग्रामविकास अधिकारी व प्रभाग एक मधील सदस्य यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांमुळे प्रथमच पाणंद मोजण्याच्या निर्णय झाला. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून याबाबतची प्रक्रिया पूर्ण करत मोजणी प्रक्रिया करण्यात आली आणि मोजणी करण्याच्या ऐतिहासिक कामगिरी पूर्ण झाली.
सर्वांना विश्वासात घेऊनच या पुढील कार्यवाही केली जाईल- सरपंच ग्रामविकास अधिकारी प्रभाग क्रमांक एक मधील सदस्य यांच्या प्रयत्न पाठपुरावा यामुळे पाणंद रस्त्यांची अधिकृत मोजणी करून पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या पुढील कार्यवाही करण्यासाठी पक्क्या रस्त्यात रूपांतर करण्यासाठी कॉंक्रिटीकरण करण्यासाठी पाणंद रस्त्यालगत असणारे खातेदार, ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन चर्चा करून चांगल्या दर्जाच्या रस्त्याला मूर्त रूप देण्यात येईल आणि नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल असे सरपंच छाया धर्णे,ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे यांनी सांगितले.










