
सावर्डे : स्वच्छता ही प्रत्येक मानवाच्या जीवनाचा पाया आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसह परिसर स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व द्यावे या उद्देशाने स्वच्छते विषयी चर्चासत्राचे आयोजन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता हीच सेवा टप्पा दोन या उपक्रमांतर्गत विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजावे त्याचबरोबर त्यांनी आपल्या पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे व याद्वारे जनजागृती व्हावी व स्वच्छता जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे ही माहिती समाजात पोहोचावी यासाठी स्वच्छते संबंधीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी जीवनातील स्वच्छतेचे महत्व याविषयी विद्यार्थ्यांना सोदाहरण माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनात स्वच्छतेचा अंगीकार करावा असे आवाहन केले. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून त्याचे सेंद्रिय खत निर्मिती कशी करता येते व त्याचा वापर आपल्या नियमित पिकांसाठी कशा पद्धतीने होतो याची माहिती याप्रसंगी विद्यार्थ्यांना देण्यात आली. शालेय जीवनापासून लागलेल्या चांगल्या सवयी उज्वल भविष्य घडवण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसह देशाच्या प्रगतीत स्वच्छतेच्या माध्यमातून हातभार लावण्यास या प्रसंगी विद्यार्थ्यांना उद्युक्त केले. या उपक्रमात विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सहभागी झाले होते. स्वच्छतेची शपथ घेताना विद्यालयातील विद्यार्थी.