
सावंतवाडी : वनविभाग आणि रॅपिड रेस्क्यू टीम यांनी माडखोल येथे माकड पकड मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 68 उपद्रवी माकडांना जेरबंद करण्यात आले. माकडांचे वाढते उपद्रव येथील शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढवत होते. नारळ, केळी आदी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला होता. माडखोल डुंगेवाडी परिसरात तर माकड घरात शिरून घरातील फळभाज्या फस्त करत होते.
या पार्श्वभूमीवर तेथे माकड पकड मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे या भागातील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वन विभाग सावंतवाडी यांनी ही मोहीम राबवली. याचा मूळ उद्देश जंगली प्राण्यांपासून माणसांना त्रास होऊ नये आणि माणसांपासून प्राण्यांचे संरक्षण व्हावे हा आहे. या उद्देशाने ही टीम काम करत असून पकडलेले वन्यजीव प्राणी नैसर्गिक अधिवासात सोडले गेले. या मोहिमेबद्दल ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.